राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यासाठी मुंब््रयात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या भागातील ज्येष्ठ नगरसेवक रौफ लाला यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत ‘एमआयएम’ पक्षाचे नेते अकबरउद्दीन ओवेसी याच्या जंगी स्वागतामुळे मुंबई, ठाण्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अगदी काल-परवापर्यंत आव्हाडांचे समर्थक मानले जाणारे रौफ लाला यांनी ओवेसींच्या स्वागतासाठी मुंब््रयात बुधवारी हिरवा गालिचा अंथरला होता. इफ्तारच्या मेजवानीनंतर ओवेसी यांनी मुंब््रयासह भिवंडी आणि मुंबईतील मुस्लीमबहुल मतदारसंघात एमआयएम आपला उमेदवार उभा करेल, अशी घोषणा केली. ही घोषणा होताच उपस्थित असलेल्या काहींनी ‘आव्हाडमुक्त मुंब्रा’च्या घोषणा देत या पार्टीत राजकीय रंग भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उपस्थित आव्हाडसमर्थकही अवाक झाल्याचे बोलले जाते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. मात्र, आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना सुमारे १२ हजारांचे मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य मिळताच आव्हाडांना लागलीच मंत्रिपदाची बक्षिशी बहाल करण्यात आली. मोदी लाटेनंतरही मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्यामुळे आव्हाड समर्थकांमध्ये जल्लोष असला तरी कळवा परिसरातून परांजपे सुमारे दहा हजार मतांनी पिछाडीवर पडल्याने विधानसभेची निवडणूक आव्हाडांना वाटते तितकी सोपी नाही, असा एक मतप्रवाह आहे. मुंब्रा परिसरातील एकगठ्ठा मताधिक्यामुळे आव्हाडांनी गेल्या वेळी विजय मिळवला.
यंदा मात्र राष्ट्रवादीतील काही मुस्लीम नेते आव्हाडांच्या विरोधात मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा असून बुधवारी झालेली इफ्तार पार्टी काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी धोक्याची ठरू शकते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक रौफ लाला यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करताना ओवेसी यांना आमंत्रित केले आणि जोरदार शक्तिप्रदर्शन घडविले. ओवेसी यांना पाहण्यासाठी मुस्लीम समाजातील तरुणांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती. या वेळी आव्हाडसमर्थक नगरसेवकही उपस्थित होते. मात्र पार्टी संपतासंपता ओवेसी यांनी मुंब्रा, भिवंडीत ‘एमआयएम’चा उमेदवार असेल आणि तो काँग्रेस-राष्ट्रवादीला टक्कर देईल, असे जाहीर केल्याने आव्हाडसमर्थक अवाक झाले. मुंब््रयातील मतविभाजन आव्हाडांना परवडणारे नाही, हे त्यांचे समर्थकही मान्य करतात.
मात्र आव्हाडांविरोधात सुरुं ग पेरताना भिवंडी, शिवाजीनगर, मुंबादेवी अशा मुस्लीमबहुल मतदारसंघांत उमेदवार उभे करू, या ओवेसी यांच्या घोषणेचे आतापासूनच वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
ओवेसी यांचे वक्तव्य फार गांभीर्याने घेण्याची गरज नसून आव्हाडांविरोधात स्वपक्षातून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पत्रकारांना सांगितले. उमेदवार उभे करण्याची घोषणा ओवेसी यांनी यापूर्वीही केली आहे. तसेच रौफ लाला यांच्या इफ्तार आयोजनात राष्ट्रवादीच्या इतर नगरसेवकांचाही समावेश होता हे विसरू नका, असेही मुल्ला यांनी स्पष्ट केले. यासंबंधी आव्हाड आणि रौफ लाला यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2014 रोजी प्रकाशित
मुंब्य्रातून आघाडीविरोधात मोर्चेबांधणी
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यासाठी मुंब््रयात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या भागातील ज्येष्ठ नगरसेवक
First published on: 29-07-2014 at 06:04 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ovesi aggressive in iftar party