समोर तीन-चार हजारांचा जमाव. शिवसैनिकांनी वकिलांमार्फत तयार करुन आणलेली फिर्याद. यामुळे वातावरण तंग झाले होते. गुन्हा दाखल केला गेला नसता तर भयंकर परिस्थिती उद्भवली असती. कदाचित दंगलही उसळली असती तर मग त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल करीत पालघर पोलिसांनी आपल्या कारवाईचे चौकशी आयोगापुढे समर्थन केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर ‘मुंबई बंद’बाबत फेसबूकवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे निर्माण झालेल्या वादातून दोन तरुणींना अटक झाली होती. या अटकेविरुद्ध तीव्र पडसाद उमटल्यामुळे पालघर पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट करताना त्यावेळी गुन्हा का दाखल करावा लागला, त्याचे स्पष्टीकरण चौकशी आयोगापुढे दिले आहे.
शनिवारी १८ नोव्हेंबरला पालघर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीकांत िपगळे हे मुलीच्या साखरपुडय़ानिमित्त रजेवर सातारा येथे गेले होते. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेच्या बंदोबस्तामुळे अवघे १२-१३ पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात होते. घटना घडली तेव्हा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक जाधव होते. शिवसैनिकांचा जमाव पोलीस ठाण्यात आला. त्यामध्ये दीड हजारांच्या आसपास महिला होत्या. वकिलही त्यांनी सोबत आणला होता. गुन्हा दाखल करा, असा प्रचंड दबाव त्यांच्याकडून होता. गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेऊ, असेही जमावाकडून धमकाविले जात होते. त्यामुळे गुन्हा दाखल करावा लागला, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
याबाबत पालघरचे पोलीस निरीक्षक पिंगळे म्हणाले, मला ही माहिती कळताच मी साताऱ्याहून निघालो. माझी दहा दिवसांची रजा शिल्लक होती. मला कुणी बोलावलेही नव्हते. पण तरीही मी तात्काळ निघून तीन वाजता पालघरला पोहोचलो. उपनिरीक्षकाने प्रसंग पाहून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला असावा. पण जर गुन्हा दाखल केला नसता तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही, असेही ते म्हणाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गळे काढणाऱ्यांना ‘त्या’ तणावाच्या परिस्थितीची कल्पना येऊ शकत नाही, असेही त्यानी स्पष्ट केले.
* या घटनेची आता चौकशी सुरू आहे. जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. पण एखादी फिर्याद पोलीस ठाण्यात आली तर आम्ही गुन्हा दाखल करून घेणे नाकारू शकत नाही – अतिरिक्त पोलीस अधीक्षक संग्रामसिंह निशाणदार
* माफीचे राजकारण
शाहिन धडा हिने काकांच्या रुग्णालयात जाऊन माफी मागितली. परंतु जमावातल्या एकाने पालघर चौकात पाचबत्ती या हुतात्मा स्मारकाच्यास्थळी जाऊन माफी मागावी, अशी मागणी केल्याचे घटनास्थानी हजर असलेल्या एका महिलेचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2012 रोजी प्रकाशित
पालघर पोलीस म्हणतात.. ..तर दंगल उसळली असती!
समोर तीन-चार हजारांचा जमाव. शिवसैनिकांनी वकिलांमार्फत तयार करुन आणलेली फिर्याद. यामुळे वातावरण तंग झाले होते. गुन्हा दाखल केला गेला नसता तर भयंकर परिस्थिती उद्भवली असती. कदाचित दंगलही उसळली असती तर मग त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल करीत पालघर पोलिसांनी आपल्या कारवाईचे चौकशी आयोगापुढे समर्थन केले आहे.
First published on: 22-11-2012 at 09:35 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar police say then riot took place