संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमावर्ती भागात सुमारे ७०० हून अधिक कुत्रे आढळून आले असून हे कुत्रे बिबळ्याचे सहज भक्ष्य असल्यामुळेच उद्यानातील बिबळ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे बिबळ्यांच्या सवयींसंदर्भातील संशोधक विद्या अत्रेयी यांनी सांगितले.
राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील बिबळ्यांचा अभ्यास अहवाल आज जारी करण्यात आला. त्याप्रसंगी विद्या अत्रेयी म्हणाल्या की, बिबळ्यांच्या अधिवासामध्ये एक आदर्श असे प्रमाण असते. त्यांना अधिवासासाठी लागणारी जागाआणि उपलब्ध भक्ष्य यावर हे प्रमाण ठरते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रत्येक बिबळ्यासाठी १० चौरस किलोमीटरचा परिसर मिळाला आहे. १०३ चौरस किलोमीटर्सचा परिसर लाभलेल्या या उद्यानामध्ये आता सुमारे २१ बिबळे आहेत, असे पाहणीतून निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासादरम्यान असे लक्षात आले की, उद्यानाच्या आसपास उपलब्ध असलेले मोठय़ा प्रमाणावरील भक्ष्य हे बिबळ्यांची संख्या वाढण्यामागचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे ११ किं वा १२ या आदर्श प्रमाणाहून जवळपास दुप्पट म्हणजेच २१ एवढी बिबळ्यांची संख्या पाहायला मिळते. त्यांच्या अंगावरील ठिपक्यांच्या पॅटर्न्सचा वापर या शास्त्रीय अभ्यासासाठी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, मुंबई महापालिकेतर्फे कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम राबविला जातो. मात्र त्याचा परिणाम या परिसरात पाहायला मिळत नाही. ७०० ही संख्या खूप मोठी आहे. त्यातही आम्हाला केवळ काहीच भागांतील कुत्र्यांची मोजणी करणे शक्य झाले. याचा अर्थ प्रत्यक्ष संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. या सीमावर्ती भागात कुत्रे आहेत, तोवर बिबळेही येत राहणार हे वास्तव आहे. त्यामुळेच पालिकेचा कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम व्यवस्थित राबविला जातो आहे काय, याचेही परिक्षण होणे गरजेचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2013 रोजी प्रकाशित
कुत्र्यांच्या मुबलक खुराकामुळे बिबळे वाढले!
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमावर्ती भागात सुमारे ७०० हून अधिक कुत्रे आढळून आले असून हे कुत्रे बिबळ्याचे सहज भक्ष्य असल्यामुळेच उद्यानातील बिबळ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे बिबळ्यांच्या सवयींसंदर्भातील संशोधक विद्या अत्रेयी यांनी सांगितले.
First published on: 09-03-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panther increased due to sufficient food of dogs