कन्नडमध्ये पेपरफुटी की सामूहिक कॉपी?

कन्नड तालुक्यातील तेलवाडी येथील समाजकल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळेतून बारावीची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका पळवून नेणाऱ्या संस्थाचालकाला शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान पोलिसांनी अटक केली.

कन्नड तालुक्यातील तेलवाडी येथील समाजकल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळेतून बारावीची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका पळवून नेणाऱ्या संस्थाचालकाला शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान पोलिसांनी अटक केली. उत्तम राठोड असे त्याचे नाव आहे. दरम्यान, हा प्रकार पेपरफुटीचा नसून सामूहिक कॉपीचा असल्याचा दावा उपसंचालक सुखदेव डेरे यांनी केला. राठोड याच्या घरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी चार प्रश्नपत्रिका जप्त केल्या.
तेलवाडी केंद्रावर ३९१ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. सकाळी ११ वाजता इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका दिली गेल्यानंतर शेजारीच संस्थाचालक उत्तम राठोड याच्या घरी सामूहिक कॉपीचा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घरात छापा टाकला असता काही शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी मदत करीत असल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक कुशल िशदे यांनी राठोड यास ताब्यात घेतले. पेपर फुटल्याची माहिती परीक्षा मंडळाचे सचिव प्रकाश पठारे यांना देण्यात आली.
झेरॉक्स प्रती काढून सुरू असलेला हा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतरही पेपर मात्र फुटला नाही, अशी भूमिका परीक्षा मंडळाने घेतली. पोलिसांनी मात्र ही प्रश्नपत्रिका संस्थाचालकाच्या घरात असल्याची टीप मिळाली असल्याचा दावा केला.
दरम्यान, या केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला जाईल. तसेच उत्तरपत्रिका तपासून सामूहिक कॉपी झाली आहे काय, याची खात्री केली जाईल, असे शिक्षक उपसंचालक सुखदेव डेरे यांनी सांगितले. तेलवाडी परीक्षा केंद्राच्या परीक्षाप्रमुख पदावरून स्थानिक मुख्याध्यापकास तातडीने बदलले जाईल, असेही डेरे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Paper leak or gang copy in kannad