धकाधकीच्या या जीवनात काही क्षण तणावमुक्त होण्यासाठी अलीकडे अनेक कुटुंबात पाळीव प्राणी पाळले जात असून यात कुत्र्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे छोटय़ा-मोठय़ा शहरांमध्ये नागरिकांसाठी राखीव असणाऱ्या उद्यानांबरोबरच पाळीव कुत्र्यांसाठी देखील पेट पार्क असावेत, अशी मागणी वाढू लागली असून नेरुळ येथील नागरिकांनी अशा प्रकारे एका उद्यानाला पेट पार्कचे स्वरूप दिले आहे.
स्पर्धेच्या या युगात ‘हर एक शक्स परेशान है, त्यामुळे तो काही तणावमुक्त क्षणांच्या शोधात असतो. यासाठी घरातील पाळीव प्राणी महत्त्वाचे ठरत असून पाळीव कुत्र्यामुळे तणावमुक्त होता येते असे सिद्ध झाले आहे. दिल्लीतील काही रुग्णालयात असाध्य आजाराने आजारी असलेल्या रुग्णांना आठवडय़ातून एकदा पाळीव कुत्र्यांशी विशेषत: लॅब्रेडॉर प्रकारातील कुत्र्यांची भेट घडवून आणली जाते. त्यामुळे रुग्णांना बरे वाटून जगण्याचा नवीन हुरूप येतो असे आढळून आले आहे. त्यामुळे मानवाचा खरा मित्र असलेल्या कुत्र्याची काळजी अलीकडे सर्वच स्तरावर घेतली जाते. त्यांचे डॉक्टर, हॉस्टेल बरोबरच त्यांच्यासाठी पावसाळी रेनकोट, बूट आणले जातात. काही कुत्र्यांचे आजूबाजूच्या इतर पाळीव कुत्र्यांना बोलवून वाढदिवस देखील साजरे केले जात आहेत. पाळीव कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना फिरण्यासाठी पेट पार्क असावेत, अशी एक संकल्पना पुढे आली आहे.
नेरुळ सेक्टर १३ मध्ये
उद्यान पेट पार्क
नागरिकांसाठी राखीव असलेल्या उद्यानात पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी नेल्यास काही जण आक्षेप घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नेरुळ येथील सामाजिक कार्यकर्त्यां आरती चौहान यांनी सेक्टर १३ मधील एक उद्यान ज्यावर अनधिकृत पार्किंग केले जात होते, त्याला पेट पार्कचे स्वरूप दिले आहे. पाळीव कुत्र्यांसाठी हा खास पेट पार्क तयार करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. राज्यातील बहुधा हा पहिलाच प्रयत्न आहे. स्थानिक पालिका निवडणूकीत उमेदवारांनी असे पेट पार्क तयार करण्याचा शब्द दिला होता पण त्यात अद्याप काहीही हालचाल न झाल्याने स्थानिक नागरीकांनी हा स्वयंस्फुर्तीने पेट पार्क अस्तित्वात आणला आहे. पालिकेने असे पेट पार्क तयार करावेत अशी मागणी केली जात आहे.