वाशी येथील मिनी सिसोरमध्ये महाविद्यालयीन तरुण व प्रेमीयुगलांची मोठया प्रमाणात रेलचेल असते. महाविद्यालयीन युवती या ठिकाणी येत असल्यामुळे काही उनाड तरुण व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर छाप टाकण्यासाठी स्पोर्टस बाईकवर स्टंटबाजी करण्याचे प्रकार घडत आहेत. स्टंटबाजीमुळे रस्त्यावर किरकोळ अपघात देखील घडत असून रस्त्यांनी जाणाऱ्या वाहनचालक आणि त्यांच्यामध्ये नेहमीच खटके उडण्याचे प्रकारही घडत आहेत. परिणामी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मिनी सिसोर येथे असणाऱ्या उद्यानामध्ये पालक आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन येत असतात. तसेच प्रेमी युगुल व नागरिकदेखील या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे मिनी सिसोर येथील रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. पण या रस्त्यावर महाविद्यालयीन तरुण तसेच काही उनाड मुले बाइकवरून स्टंटबाजी करत असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना त्याचा अडथळा होतो. एखाद्या सुज्ञ नागरिकाने या युवकांना जाब विचारला तर त्याच्याशी हे युवक अरेरावीची भाषा करतात. या ठिकाणी पोलिसांची गस्त नसल्यामुळे असे प्रकार होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
या ठिकाणी नेहमीच महाविद्यालयीन तरुणांची स्टंटबाजी सुरू असते. त्यांच्या गाडय़ाच्या होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाने त्रास होत असतो. तरुणांची स्टंटबाजी सुरू असताना या ठिकाणाहून पार्क करण्यात आलेली गाडी काढणे भीतिदायक होते. दीपक जाधव, नागरिक.