सिव्हिल लाईन्समधील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह वगळता दुसरे मोठे प्रेक्षागृह आजघडीला नागपूर शहरात नाही. इतर सगळी प्रेक्षागृहे कमी आसनक्षमतेची आहेत. पश्चिम नागपूर वगळता अन्यत्र चांगल्या प्रेक्षागृहांची वानवाच आहे. एकीकडे, शहरातील सांस्कृतिक व साहित्यिक घडामोडी तसेच शहराचा विस्तार वाढत असताना चांगले प्रेक्षागृह नसणे ही आयोजकांच्या व एकंदर सांस्कृतिक  क्षेत्राच्यादृष्टीने अडचणीची बाब ठरत आहे. सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचे काम अनेक दिवसांपासून पुढे सरकलेले नाही. विदर्भ साहित्य संकुलातील प्रेक्षागृह अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. अशा परिस्थितीत नवी सभागृहे निर्माण व्हावीत याकरिता नव्या मुख्यमंत्र्यांकडून सांस्कृतिक व साहित्यिक  क्षेत्राला अपेक्षा राहणार आहेत.  
हौशी कलावंत व सर्व प्रकारच्या आयोजकांच्या सोयीच्यादृष्टीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह रास्त दरात उपलब्ध व्हावे ही सुद्धा शहरातील सांस्कृतिक  क्षेत्राशी संबंधित सर्वाचीच मागणी आहे. या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रयत्न करावेत ही अपेक्षा राहणार आहे. नागपुरात सांस्कृतिक कार्य संचालनालय आहे. मात्र, ते व्यवस्थित कार्यान्वित होणे गरजेचे आहे. तसेच जिल्हास्तरावर सभागृहांची उपलब्धता असल्यास त्या त्या ठिकाणच्या सांस्कृ तिक चळवळींना बळ मिळणार आहे. याव्यतिरिकत, ज्येष्ठ कलावंत तसेच लोककलावंतांच्या निवृत्तीवेतनासारखे रेंगाळलेले प्रश्न फडणवीसांच्या कारकीर्दीत सुटावेत, अशी अपेक्षादेखील सांस्कृतिक क्षेत्र बाळगून आहे.

विदर्भात सांस्कृतिक क्षेत्रात खूप काम करायची गरज आहे. विदर्भातील विविध भागातील थिएटरचे भाडे मोठय़ा प्रमाणात वाढले आहे त्यामुळे ते कमी करण्यात यावे जेणे करून हौशी रंगभूमीला व्यासपीठ उपलब्ध होईल. शिवाय सांस्कृतिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी देवेंद्रने विदर्भाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे आणि तो देईल असा विश्वास आहे.
मदन गडकरी ,ज्येष्ठ नाटककार