मराठीच्या मुख्य केंद्रापासून दूर, हैदराबादच्या निजामाचे जोखड झुगारलेल्या, स्वातंत्र्याचे कोवळे ऊन पाहिलेल्या पिढीचे साहित्यिक म्हणजे लक्ष्मीकांत तांबोळी. तांबोळी आज (शनिवारी) वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण करीत आहेत. आपल्या लेखनाची अर्धशतकी वाटचालही पूर्ण केली आहे. या वाटचालीत मराठी कवितेच्या पुलाखालून धो धो पाणी वाहून गेले. गाळगळाठाही साचला. पण तांबोळी यांच्या नितळ ‘निवळ कवितेचा’ झरा निरंतर ‘वाहता’ राहिला; तो अजूनही वाहतोच आहे.
सन १९५९ मध्ये त्यांचा ‘हुंकार’ काव्यसंग्रह प्रकाशित झाला. महाराष्ट्र कवी यशवंत यांच्या हस्ते प्रकाशन व कवयित्री इंदिरा संत यांची प्रस्तावना असा अपूर्व योग ‘हुंकार’ला लाभला. काही दिवसांतच त्यांचा ‘जन्मझुला’ हा काव्यसंग्रह ‘मौज’ प्रकाशनच्या वतीने येतो आहे. ‘हुंकार’ ते ‘जन्मझुला’ ही वाटचाल तांबोळींची काव्यपंढरीची जणू अखंड वारीच होय.
‘हुंकार’ या पहिल्या संग्रहात –
‘एक नि:श्वास तुझा रे वेद जाहला जगात,
लक्ष उसासे आमचे घरोघरी कुजतात’
असे उद्गार काढणारा हा कवी ‘जन्मझुला’ मध्ये
‘पारावार नाही आता चांदण्याला,
आभाळ अपुरे चंद्र गोंदण्याला!’
असे सहज लिहून जातो.
– तांबोळी यांनी कवितेसह कथा, कादंबरी, ललित, गद्य, काव्यसमीक्षा असे लेखनही केले. विविध दैनिकांतून सदरांचे लेखनही केले. त्यांच्या पहिल्याच कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार (१९७१) मिळाला. एकविसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही झाले. देगलूर महाविद्यालयात ३६ वष्रे म्हणजे ३ तपे त्यांनी अध्यापन केले. साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. लेखणी व वाणी यांच्या आराधनेत कधी खंड पडला नाही.
तसा त्यांचा मनोधर्म एका ठिकाणी थांबणारा नाही. अनेक वाटांनी त्यांची मुशाफिरी सुरूच असते. आता पंचाहत्तरीच्या उंबरठय़ावरही देहभान, मनोभान, वर्तमान व एकूण कालमान तांबोळी जोखून आहेत. आजही त्यांचे सृजनगान सुरूच आहे. तांबोळींनी कवितेच्या तारूण्यासोबतच व्यक्तिमत्त्वाचेही ताजेपण टिकविले आहे. आयुष्याच्या प्रवासात ‘श्वासोच्छ्वासा’सारखी कविता त्यांच्यासोबत आहे. सर्वासारखेच अकल्पित, अनपेक्षित, बरे-वाईट असे खूप काही त्यांच्याही आयुष्यात घडून गेले आहे. त्यांनी तेही पचविले आहे, म्हणूनच की काय –
‘पंख होते तेव्हा आभाळ पाहिले
सरडय़ाचे जिणे नशिबात आले
त्यातही भरले नको तेच रंग
कुंपण राहिले तेवढे अभंग’
अशी आपल्या मर्यादेची कथा व्यक्त करताना पंख फुटण्याआधीच्या झुंजीचेही दर्शन त्यांनी घडविले. त्यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनात खूप अंतर असले, तरी काव्यलेखनाचे सातत्य जाणवते. त्यांच्यापुरता कविता म्हणजे जणू काही नवनवलोत्सवच. अन्यथा वर्तमान विपरीत काळात त्यांची लेखनव्रत्ती ‘वृत्ती’ पार कोमेजली असती. असे घडले नाही, घडायचेही नसावे म्हणून तर अमृतमहोत्सवी पर्वाकडे त्यांचा प्रवास सुरू राहिला. ‘आयुष्यभर परदेशीपण भोगणाऱ्या या माणसाला केवळ ‘वाटा’चीच संगत आहे. माणसाचे असे एक चित्र या कवितेत रेखाटले गेले आहे,’ असे तांबोळींच्या कवितेबद्दल डॉ. सुधीर रसाळ म्हणतात ते खरेच आहे. (आगामी ‘जन्मझुला’ संग्रहाची पाठराखण)
तांबोळी यांना पंचाहत्तरीनिमित्त शुभेच्छा देताना त्यांच्याच शब्दांत –
‘पाय आपलेच असले तरी वाटा आपल्या नसतात,
आपण आपले चालत जावे वाटा आपल्या करीत जावे.’
आणि  
‘वाटांचे ते काय? चालतात पाय.
ज्याची वाट त्याला बोभाटा कशाला?’
असेही तांबोळीच लिहितात, हेही नवलच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet of amlan pratibha
First published on: 21-09-2013 at 01:55 IST