जिल्ह्यात रंगपंचमीच्या भांडणांमध्ये नऊ जखमी
अमरावती जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली असली तरी काही गावांमध्ये त्याला भांडणांचे गालबोट लागले. या भांडणांमध्ये नऊ जणांना जखमी व्हावे लागले, तर शहरात ‘ड्रंकन्ड ड्राईव्ह’मध्ये पोलिसांनी तीस तळीरामांना ताब्यात घेतले.
रंग लावण्यावरून जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या भांडणांमध्ये शस्त्रांचाही वापर झाला. माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डवरगाव येथे लहान मुलगा रंग खेळताना शेजारच्या घरी गेला. घराच्या ओटय़ावर रंग उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून खंडारे आणि तायडे कुटुंबांमध्ये जोरदार भांडण झाले. या मारहाणीत दोन महिला जखमी झाल्या. खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंडिकापूर येथे नीलेश खलाटे हा युवक आपल्या दुकानात बसला असताना आरोपींनी त्याला दारू पिण्यासाठी २०० रुपये मागितले. त्याने नकार देताच चाकूहल्ला करून नीलेशला जखमी करण्यात आले. दोघाही आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. नांदगाव खंडेश्वरजवळील बोरी येथे आरोपी सुधाकर नाईक (४३) हा दारूच्या नशेत हाती कुऱ्हाड घेऊन जात असताना रामदास नाईक (४५) याला त्याने शिवीगाळ केली. हटकल्यावर सुधाकरने रामदासच्या मुलाला दगड मारून जखमी केले.
परतवाडा येथे कालीमाता मंदिर परिसरात भावासोबत अन्य एक इसम भांडत असल्याचे पाहून सतीश धुर्वे (२२) हा भांडण सोडवण्यासाठी गेला, पण मध्यस्ती करण्यासाठी का आला, असा उलट जाब विचारून भावानेच सतीशच्या डोक्यावर कैची मारून त्याला जखमी केले. दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिलोरी येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायालाच तीन आरोपींनी धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. कुऱ्हा येथे पंकज कोठेकर हा युवक भावासोबत होत असलेले भांडण सोडवण्यासाठी गेला असताना चार जणांनी त्याला लाथाबुक्क्या आणि काठीने मारहाण केली. मोर्शीजवळील हिवरखेड गावात तीन मद्यधुंद आरोपींनी सुनील उघडे यांची मोटरसायकल अडवली आणि त्याच्यासोबत भांडण केले. त्याच्या गाडीच्या काचा फोडून जबर मारहाणही केली. मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली गवळी येथे भावाचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन आरोपींनी काठीने मारहाण केली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे.
जिल्ह्यात आणि शहरात ठिकठिकाणी छापे मारून अवैध दारूसाठा जप्त करण्यात आलाच, शिवाय मंगळवारी रात्रीपासूनच दारू प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. शहरात तीस जणांना ‘ड्रंकन्ड ड्राईव्ह’मध्ये ताब्यात घेण्यात आले. कोतवाली पोलिसांनी दहा जणांना दारूच्या अंमलाखाली धोकादायकरीत्या वाहन चालवताना पकडले. वलगाव पोलिसांनी ६, गाडगेनगर पोलिसांनी ५, राजापेठ पोलिसांनी ४, खोलापुरी गेट, भातकुली, नांदगावपेठ आणि फ्रेझरपुरा पोलिसांनी प्रत्येकी एका तळीरामाला पकडले.