येथील आदर्श कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पुष्कराज ट्रॅव्हल्सचे मालक युवराज पन्हाळे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. पैकी चौघांना न्यायालयात हजर केले असता ११ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पुतण्या संतोष व्यंकट पन्हाळे यास गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता १३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पन्हाळे यांचे मोठे बंधू हरिश्चंद्र पन्हाळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फिर्याद दिली. मालमत्तेच्या वादातून पन्हाळे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांचा खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संतोष व्यंकट पन्हाळे, कमलाकर अनिरुद्ध बस्तापुरे, गणेश अंगद सगर, गोविंद पांडुरंग कुटवाड, व्यंकट पांडुरंग कुटवाड, मधुकर अनिरुद्ध बस्तापुरे, व्यंकट ज्ञानोबा पन्हाळे या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. मधुकर बस्तापुरे व व्यंकट पन्हाळे यांचा शोध पोलीस घेत आहेत.