घरगुती कलहातून पोलीस शिपायाने बहीण व पत्नीवर गोळीबार केला. यात बहीण घटनास्थळीच ठार झाली तर पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर मेयोमध्ये उपचार सुरू आहे. ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारी रोडवरील बाबा दीपसिंग नगरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.  
राजेश नत्थुजी ब्राम्हणकर (४५) असे आरोपीचे नाव असून तो गोंदिया जिल्ह्य़ातील गंगाझरी पोलीस ठाण्यात शिपाई आहे. राजेश हा पत्नी रितू (४०), मुलगा राज (१२) आणि मुलगी राणी (१०) यांच्यासोबत बाबा दीपसिंग नगरात राहात होता. तळमजल्यावर म्हातारे वडील नत्थुजी ब्राम्हणकर (७०) आणि बहीण प्रेमलता (४०) राहात होती. राजेशला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो दर आठवडय़ातून किंवा पंधरा दिवसातून घरी यायचा. प्रत्येकवेळी तो घरच्यांशी भांडण करत होता. प्रेमलता वडिलांकडेच राहात असल्याने तिचा तो प्रचंड राग करत होता. नेहमीप्रमाणेच राजेश गुरुवारी संध्याकाळी स्टेनगन घेऊन घरी आला. दारूच्या नशेत त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. राजेशला नंदा नावाची एक विधवा बहीण असून तिच्या मुलाचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे मुलाची पत्नीही माहेरी निघून गेली. ती एकटीच राहात होती. नंदालासुद्धा वडिलांकडेच राहू द्यावे, असे त्याचे मत होते. याच कारणावरून शुक्रवारी सकाळी त्याचे पत्नी रितूसोबत भांडण झाले. या भांडणात तो रितूला मारहाण करू लागला. याचवेळी प्रेमलता मध्ये पडली. परंतु संतापाच्या भरात राजेशने स्टेनगनमधून रितूवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी तिच्या पायाला लागली तर दुसरी गोळी तिच्या खांद्याला लागली. त्यात ती गंभीर जखमी झाली. याचवेळी वहिणीच्या मदतीला धाऊन आलेल्या प्रेमलताच्या पोटावर त्याने एक गोळी झाडली. ती पोटातून आरपार निघाली. गंभीर जखमी झाल्याने ती घटनास्थळीच ठार झाली. यावेळी वडिलाने मध्यस्थी केली असता त्यांनाही त्याने मारहाण केली. त्याची दोन मुले मात्र दूर अंतरावरून हा सर्व प्रकार बघत होते. गोळ्यांचा आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. परंतु राजेशच्या हाती स्टेनगन असल्याने कुणीही पुढे येत नव्हते. त्याने स्टेनगन जेव्हा मुलाजवळ दिली तेव्हाच परिसरातील नागरिक घटनास्थळी गेले. त्यांनी लगेच ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने जरीपटका पोलिसांना सूचित केले. त्यानुसार जरीपटका पोलिसांचा ताफा घटनास्थळी आला. त्यांनी राजेशला ताब्यात घेतले तसेच त्याच्याजवळील स्टेनगन जप्त केली. पोलिसांनी नंतर त्या स्टेनगनमधून २५ जिवंत काडतुसे जप्त केली. त्याची पत्नी रितूला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून राजेश ब्राम्हणकरला अटक
केली.