येथील सय्यद तुराबूल हक्क उरसाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा जमादाराने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. गुरुवारी भरदुपारी दोनच्या सुमारास परभणी शहरातील जांब नाक्यावर हा प्रकार घडला. या प्रकारानंतर सहकारी पोलिसांनी आरोपीला थांबविण्याऐवजी प्रत्यक्षात घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी जमादारास अटक करण्यात आली.
जांब नाक्यावर काही दिवसांपूर्वी कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत चौकी उभारण्यात आली. सध्या शहरात ऊरुस सुरू असल्याने या चौकीत नानल पेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी खंडेराव दिगंबर सोडगिर यांना बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील जमादार आर. एफ. फारुखी याने अचानक या चौकीत येऊन सोडगिर यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे सोडगिर खाली कोसळले. या वेळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी सोडगिर यांना मदत करण्याऐवजी आरोपीसोबत पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत सोडगिर स्वतच रिक्षामधून सरकारी दवाखान्यात दाखल झाले. रक्तबंबाळ अवस्थेत व पोलिसी गणवेशात आलेल्या सोडगिर यांना पाहून डॉक्टरही हादरले. त्यांनी तत्काळ सोडगिर यांना दाखल करुन उपचार सुरू केले. परंतु १५ मिनिटांतच सोडगिर यांचे निधन झाले. सोडगिर यांच्या हृदयावर शस्त्राचा घाव बसल्याने मृत्यू झाला.
हा प्रकार कळताच सहायक अधीक्षक प्रणव अशोक यांच्यासह पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. सोडगिर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्यावर ७-८ वार झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले. आरोपी फारुखी यास अटक करण्यात आली. फारुखी व सोडगिर हे दोघे पोलीस वसाहतीत एकमेकांच्या शेजारी राहतात. या खुनामागे अनतिक संबंध असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात होती.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
जमादाराकडून पोलीस शिपायाचा निर्घृण खून
गंभीर जखमी अवस्थेत सोडगिर स्वतच रिक्षामधून सरकारी दवाखान्यात दाखल झाले. रक्तबंबाळ अवस्थेत व पोलिसी गणवेशात आलेल्या सोडगिर यांना पाहून डॉक्टरही हादरले.
First published on: 07-02-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police kills police