होळी व धुलीवंदनानिमित्त शहरात सात हजाराहून अधिक तर ग्रामीण भागात तीन हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले असून सार्वजनिक शांतताभंग करणाऱ्यांची थेट पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आज नागपुरात सव्वातीनशेहून अधिक होळ्या पेटल्या. होळी व रंगांचा सण धुलीवंदन हा जुने वैमनस्य विसरून प्रेमभाव जपण्याचा सण. पण गेल्या काही दिवसात मद्याच्या आहारी गेलेल्यांनी या सणाचे रूपच पालटून टाकले आहे. मद्यप्राशन, मांसाहार तसेच नशेत धुंद राहून शांतता भंग करण्याचे प्रकार सर्रास वाढीस लागले आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस यंदा तत्पर आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहर व ग्रामीण भागात तीनशेहून अधिक संशयित गुन्हेगारांवर विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. आज दिवसभरही कारवाई सुरूच होती. कुख्यात गुंड इरफान उर्फ इप्पा पीर मोहम्मद खान याला ‘एमपीडीए’ स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. शहरात सात हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्या अतिसंवेदनशिल वस्त्यात तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात वीसहून संवेदनशिल तसेच दहाहून अधिक अतिसंवेदनशिल वस्त्या असून तेथे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शहरात प्रत्येक चौरस्त्यावर पोलीस तैनात आहेत. महिला वसतिगृह तसेच धार्मिक स्थळांसमंोरही सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांच्या तुकडय़ा प्रत्येक गल्लीत गस्त घालत आहेत. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखालील स्ट्रायकिंग फोर्स त्यांना ठरवून दिलेल्या भागात सतत गस्त घालतील. नियंत्रण कक्षात तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात राखीव पोलीस ताफा तैनात आहे. क्युआरटीच्या तुकडय़ा शहराच्या विविध भागात गस्त घालत आहेत. याशिवाय पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्तही शहरात गस्त घालतील.
जागोजागी खाकी व पांढऱ्या गणवेशातील पोलीस नाकाबंदी करीत असून मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. शांतताभंग करणाऱ्यांना थेट गजाआड करण्याचे आदेश त्यांना आहेत. आज दुपारी पोलीस आयुक्तांनी बैठक घेऊन बंदोबस्तासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ग्रामीण भागातही तीन हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय क्युआरटी व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना अतिसंवेदनशिल गावांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस आयुक्त कौशल पाठक, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, अनंत शिंदे, उपायुक्त संजय दराडे, चंद्रकिशोर मीणा, सुनील कोल्हे, कैलास कणसे, मंगलजित सिरम, राजेश जाधव व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखडे, डॉ. सूर्यभान इंगळे, रामलखन यादव यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या असून सण शांततेत साजरा करा, असे आवाहन केले आहे.