विधानसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी नवी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. कोणतीही परिस्थिती हाताळण्यास पोलीस सक्षम असल्याचा विश्वास अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या वेळी २३ जणांनावर तडीपारीची तर १ हजाराहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्याची मुदत अद्याप संपली नसल्याने त्याच्याकडून काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल असा इशारा ही त्यांनी दिला आहे. नियम तोडणारा कोणीही असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याच बरोबर निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे.
निवडणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. याचबरोबर गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या कार्यकत्यांकडून किंवा गुंडांकडून निवडणुकीच्या काळात कोणाताही उपद्रव होऊ नये यासाठी पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी २३ जणांना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार केले आहे.
त्याचप्रमाणे १ हजार ८१८ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या, यांची मुदत सहा महिन्याची असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. याचप्रमाणे शहरात सुमारे १३०० जणांकडे शस्त्र परवाने आहेत. सरंक्षणासा़ठी दिलेल्या या शस्त्रांचा निवडणुकीमध्ये दुरुपयोग होऊ नये, याकरिता निवडणूक आचारसंहिता लागताच २९४ परवानाधारकांना त्यांची शस्त्रे आयुक्तालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या व्यतिरिक्त २७१ हून अधिक परवानाधारकांनी स्वत:हून त्यांची शस्त्रे जमा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात ३७५, ऐरोली विधानसभा मतदारसंघात ३७९, पनवेल विधानसभा मतदारसंघात ४४१ आणि उरण विधानसभा मतदारसंघातील ३०९ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी असणार आहे.
या शिवाय दोनपेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या परिसरात १ अधिक पोलीस कर्मचारी, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या परिसरात दोन अधिक कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याशिवाय २ केंद्रीय दलाच्या आणि १ राज्य राखीव दलाची तुकडी नवी मुंबई पोलिसांच्या मदतीला आहे. १०० मोबाइल पट्रोलिंग युनिट कार्यरत असणार आहेत. त्याचप्रमाणे नियंत्रण कक्षातदेखील राखीव पोलीस बल ठेवण्यात आले आल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.