श्रेया घोषाल संगीत रजनीच्या निधी संकलनासाठी वीज केंद्रातील कंत्राटदारांच्या बैठकीची चर्चा रंगली असतांना जिल्हा पोलीस दलाने आता तर थेट राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मिळेल तेथून पैसे आणा, असे निर्देश वरिष्ठांनी दिल्याने पोलीस दारोदारी निधी संकलन करीत असतांनाचे चित्र येथे बघायला मिळत आहे.
जिल्हा पोलीस कल्याण निधीसाठी म्हणून २१ जानेवारीला पाश्र्वगायिका श्रेया घोषाल संगीत रजनी होत आहे. त्यासाठी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून निधी संकलन करण्याची मोहीम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिनाभरापासून राबविण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी ३ कोटी २५ लाखाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी जिल्ह्य़ातील २५ पोलीस ठाणे, सात पोलीस उपठाणे व वणी कॅम्प येथे कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकापासून तर हवालदार व शिपाईही कामाला लागले आहेत. शहरातील कोळसा, ट्रान्सपोर्ट, मद्य, जुगार अड्डे, बीअर बार, हॉटेल व भंगार विक्रेते, तसेच इतर छोटय़ा मोठय़ा व्यापाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला तरी उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे बघून महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटदारांची बैठक बोलाविण्यात आली होती. तेथून आर्थिक मदतीचे आश्वासन मिळाल्यानंतर एका सुपीक डोक्याच्या पोलीस अधिकाऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये मोठय़ा प्रमाणात व्यापाऱ्यांचा काळा पैसा जमा असतो. त्यामुळे तेथूनही आपण संगीत रजनीसाठी निधी संकलन करू शकतो, असा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या व्यवस्थापकांची एक बैठक पोलीस मुख्यालयात बोलाविण्यात आली होती.
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातून निमंत्रण मिळाल्याने जिल्ह्य़ातील बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या व्यवस्थापकांनी या बैठकीला हजेरी लावली. बैठकीची वेळ ११.३० ची आणि वरिष्ठ अधिकारी पोहोचले १ वाजता. तब्बल दीड तास उशिराने ही बैठक सुरू झाल्यानंतर साहेबांनी थेट विषयाला हात घालून पोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमाला राष्ट्रीयीकृत बॅंकांनी मदत करावी, अशी विनंती बॅंक व्यवस्थापकांना केली. या बैठकीला हजर एक दोन बॅंक व्यवस्थापकांनी बॅंकेत व्यापाऱ्यांचा पैसा राहत असला तरी तो वापरायची आम्हाला परवानगी नाही आणि अशी आर्थिक मदत आम्ही करू शकत नाही, सांगून साहेबांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐकणार ते साहेब कसले. यावर्षी आम्हाला टार्गेट पूर्ण करायचे आहे, तेव्हा तुम्ही बॅंकेकडून जमेल ती मदत द्या, असे म्हणून साहेबांनी एकदाचा विषय संपविला.
त्यानंतर बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांना संगीत रजनीसाठी आर्थिक मदतीचे पत्रही देण्यात आले. आता २१ तारीख जवळ येत असतांना पोलिसांनी बॅंक व्यवस्थापकांकडे आमच्या आर्थिक मदतीच्या पत्राचे काय झाले, अशी विचारणा करणे सुरू केले आहे. काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी जमेल ती मदत केली सुध्दा, परंतु बहुतांश बॅंकांनी नकार कळविल्याने आता पोलीस अधिकारी जाम चिडले आहेत. काहीही करा परंतु आम्हाला आर्थिक मदत करा, अशी विनंती करतांना आता हे अधिकारी दिसत आहेत. त्यावर बॅंक व्यवस्थापकही आम्ही विभागीय कार्यालयाकडे तुमचे विनंती पत्र पाठविले आहे. अद्याप उत्तर आलेले नाही त्याला आम्ही तरी काय करणार, असे म्हणून पोलीस अधिकाऱ्यांची समजूत काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांची बॅंक असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयालाही संगीत रजनीसाठी आर्थिक मदतीचे पत्र देण्यात आले आहे, तसेच भारतीय स्टेट बॅंकेलाही या आशयाचे पत्र देण्यात आले असल्याची माहिती याच बॅंकेतील एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. एकूणच संगीत रजनीच्या नावाने जिल्हा पोलीस दलाने आर्थिक लूट सुरू केली असल्याचा आरोप आता सर्वसामान्यांनी सुरू केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आधीच या लुटीची तक्रार गृहमंत्र्यांकडे केली आहे. आता इतरही पक्षांचे पुढारी पोलिसांच्या या वसुलीला कंटाळले असून ते सुध्दा तक्रारीच्या मनस्थितीत आहेत.
श्री श्री रवीशंकर यांच्या कार्यक्रमाच्या
निमित्ताने आर्थिक वसुली
आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांच्या हॅप्पीनेस कार्यक्रमासाठी सुध्दा शहरातून अशाच पध्दतीने मोठय़ा प्रमाणात वसुली करण्यात आली. २१ हजार, १५ हजार, ११ हजार, ५ हजार व ११०० रूपयांच्या तिकीटा लोकांच्या माथी मारण्यात आल्या. जवळपास एक ते दिड हजार तिकीटांची अशा पध्दतीने विक्री करण्यात आली. मात्र आध्यात्मिक गुरूंनी आध्यात्मावर दोन शब्द बोलण्याऐवजी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुस्तीसुमने उधळली. त्यांच्या दर्शनासाठी एकत्रीत आलेल्या हजारो भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी थातूर मातूर उत्तरे देत ४५ मिनिटातच मंचावरून निघून गेल्याने तिकीट खरेदी करून कार्यक्रमाला उपस्थित झालेले भक्त व श्रोतागण चांगलेच संतापले आहेत. श्री श्रींवरील हा संताप आता सर्वजण व्यक्त करत आहेत. केवळ निधी संकलनासाठीच श्री श्री येथे येवून गेलेत अशीही टीका करीत आहेत.