शहरातील सात मोठय़ा उद्यानांमध्ये शुल्क लागू केल्यानंतर िपपरी पालिकेने नव्याने आणखी काही उद्यानांमध्ये प्रवेश फी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याखेरीज, उद्यानांमध्ये चित्रीकरणासाठी असलेले दर अडीच पटीने वाढणार असून फोटोग्राफीसाठी नव्याने शुल्कआकारणी सुरू होणार आहे. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना यापुढे उद्यानांमध्ये बंदी राहणार असून राजकीय पक्षांचे झेंडे व बॅनर्स लावण्यासही अटकाव करण्यात येणार आहे.पालिकेच्या काही उद्यानांमध्ये प्रवेश फी लागू करण्याचे धोरण ठरवण्याचा विषय २० नोव्हेंबरच्या सभेत आहे. विधी समितीने हा विषय मंजूर केला असून पालिका सभेने मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. निगडीतील दुर्गादेवी उद्यान, भोसरी तळे उद्यान, थेरगावचे बोटक्लब व बारणे उद्यान, िपपळे गुरव येथील जिजाऊ उद्यान, नेहरूनगरचे गुलाबपुष्प उद्यान आदी ठिकाणी सध्या प्रवेश शुल्क आहे. त्यात आणखी काही उद्यानांची भर पडणार आहे. उद्यानांचे महत्त्व अबाधित राखणे व उत्पन्नात भर पाडण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापुढे पालिकेच्या उद्यानांमध्ये राजकीय कार्यक्रम घेता येणार नसून राजकीय झेंडेही लावता येणार नाही, असे याबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. सध्या चित्रीकरणासाठी ८ तासांचे २ हजार रुपये आकारले जातात, त्यात वाढ करून ५ हजार रुपये आकारण्याचे प्रस्तावित आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, कविता, व्याख्याने व शालेय कार्यक्रमांसाठी सध्या शुल्क आकारले जात नाही. मात्र, येत्या काळात एक हजार रुपये प्रत्येकी आकारण्यात येणार आहेत. तसेच उद्यानांमधील कुंडय़ांचा वापर करायचा झाल्यास प्रतिकुंडी ५ रुपये शुल्कआकारणी होणार आहे. पालिकेच्या कार्यक्रमांसाठी उद्याने मोफत उपलब्ध होणार असून इतर संस्था व आयोजकांसाठी प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वानुसार वाटप होणार आहे. न्यायालयाचे निर्देश सर्वावर बंधनकारक राहणार आहेत. उद्यानांमध्ये होणारे कार्यक्रम विनामूल्य असावेत. उद्यानांमध्ये कोणतेही खाद्यपदार्थ तयार करू नयेत, अशा तरतुदी प्रस्तावात असून याबाबतचा निर्णय मंगळवारी सभेत होणार आहे.