मराठवाडय़ाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे राजकारण झाले. त्यामुळे मराठवाडय़ाची अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही, असा आरोप भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्ता देशकर यांनी शनिवारी येथे बोलतांना व्यक्त केला.
येथील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये शनिवारपासून आठव्या जलसाक्षरता संमेलनाला सुरूवात झाली. या वेळी डॉ. देशकर प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.चंद्रकुमार नलगे होते.
एकनाथ पाटील यांनी, राज्य शासन पाण्याचा वापर काटेकोर पध्दतीने व्हावा यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना राबवित आहे, याचे विवेचन केले. जलव्यवस्थेचे नेटके नियोजन ही काळाची गरज असून त्याबाबतीत आपला विभाग सतर्कतेने प्रयत्नशील राहिल, अशी ग्वाही दिली.अध्यक्षीय भाषणात प्रा.नलगे म्हणाले,‘‘मराठी साहित्यामध्ये पाणी या विषयावर बरेचसे लिखाण झालेआहे.’’ त्यासंदर्भातील कादंबऱ्या, कथा, कविता यांचा सोदाहरण आढावा त्यांनी घेतला. एका दुर्लक्षित विषयावर हे मंडळ काम करीत असल्याचे नमूद करून भविष्यात जलसाक्षरता उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जलसाक्षरतेसाठी कार्य करणारे उल्हास परांजपे यांचा सत्कार करण्यात आला.
उद्या रविवारी जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे. मंडळाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिलराज जगदाळे यांनी संमेलनामागील हेतू स्पष्ट केला. राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधल्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी कशी मदत झाली याची माहिती त्यांनी दिली. अरूणा सबाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास महापौर जयश्री सोनवणे, कवी विठ्ठल वाघ, मीलन होळणकर, पल्लवी कोरगांवकर,अभिजित घोरपडे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी खलिल अन्सारी आदी उपस्थित होते. संमेलनापूर्वी शहरात जलदिंडी काढण्यात आली. याद्वारे जलसाक्षरतेचे महत्त्व पटविण्याचा प्रयत्न झाला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2013 रोजी प्रकाशित
मराठवाडय़ाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे राजकारण – देशकर
मराठवाडय़ाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे राजकारण झाले. त्यामुळे मराठवाडय़ाची अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही, असा आरोप भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्ता देशकर यांनी शनिवारी येथे बोलतांना व्यक्त केला. येथील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये शनिवारपासून आठव्या जलसाक्षरता संमेलनाला सुरूवात झाली.
First published on: 19-01-2013 at 08:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics behind keeping marathwada deprived from water deshkar