जायकवाडी जलाशयातून डिसेंबरमध्ये पाण्याचे आवर्तन देताना नगर व नाशिकमधील धरणातून साडेनऊ टीएमसी पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय काँग्रेसवर कुरघोडी करणारा असल्याचे मानले जात आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या खात्याने निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही तर ती काँग्रेसमुळे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होत आहे. विशेषत: नगर जिल्ह्य़ात या निर्णयाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेता जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली. अंमलबजावणी कधी व कशी होणार, याचे उत्तर न देता केलेली ही घोषणा निव्वळ राजकीय खेळीचा भाग असून राष्ट्रवादीने जायकवाडीच्या पाण्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे.
डिसेंबरमध्ये पाणी सोडल्यास ते जायकवाडीपर्यंत किती पोहोचेल, असा प्रश्न मराठवाडय़ातून उपस्थित केला जात आहे. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केलेली घोषणा मोघम व अपुरी आहे, अशी टीका मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीचे प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी केली. पाणी नेमके कधी व कोणत्या धरणातून सोडणार, हा तपशील देण्याचे जलसंपदा मंत्र्यांनी हेतुत: टाळल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाणी सोडण्यास जेवढा उशीर होईल, तेवढा पाण्याचा वहनव्यय वाढेल. परिणामी पाणी पोहोचणार नाही. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाची जलसंपदा विभागाने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या एका एकरला तरी पाणी मिळावे, याची अंमलबजावणी करण्यासाठी दिवाळीपूर्वी पाणी सोडावे आणि त्याच्या तीन आवर्तनांमध्ये दिले जावे, अशी मागणी केली जात आहे. जायकवाडीचा प्राथमिक सिंचन कार्यक्रमही जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.