कामठीतील काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने शेकडो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात गॅस्ट्रो रुग्णांची संख्या वाढत आहे. कामठीतील पिवळी इमारत, कोलसाटाल, तुमडीपुरा या भागात गेल्या सात दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेकडो नागरिकांना हगवण, उलटीचा त्रास होत आहे. या नागरिकांना कामठीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे बेडची संख्या अपुरी पडत असल्याने काही नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. गॅस्ट्रो झालेल्या रुग्णांची निश्चित संख्या कळली नसली तरी ती शंभरच्या जवळपास असल्याचे कामठीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रावण केळझळकर यांनी म्हटले आहे. सध्या आरोग्य विभाग व नगरपरिषदेतर्फे या रुग्णांवर उपचार केले जात आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार केले जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली असल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ही जलवाहिनी कुठे फुटली, याचा शोध नगरपरिषदेचा पाणी पुरवठा विभाग घेत आहे.