रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे वाहनधारकांच्या रोषाचे धनी होऊ नका, वेळीच खड्डे बुजवा. त्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुरविल्या जातील. या कामात चालढकल झाल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा ‘सांबा’च्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांनी दिला आहे. या संदर्भात चार मंडळांतील १९ कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाच्या अखत्यारीत नाशिकसह जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार हे जिल्हे येतात. प्रदीर्घ काळ या खात्याच्या मंत्रिपदाची धुरा नाशिककडे होती. यामुळे किमान विभागात तरी खड्डेमुक्त रस्त्यांची अनुभूती मिळेल अशी वाहनधारकांसह सर्वसामान्यांची अपेक्षा होती; परंतु वास्तवात परिस्थिती मात्र वेगळी आहे. पावसाळा सुरू झाला की कोंणताही रस्ता असो, खड्डे पडण्यास सुरुवात होते. काही भागांत असे खड्डे पडतात की, रस्ता आहे की खड्डे, असा प्रश्न पडावा. पावसाळ्यात खड्डे नवीन नसले तरी ऐन हिवाळ्यात रस्त्यांची स्थिती चांगली नसल्याचे दिसते. पावसाळा संपुष्टात येऊन तीन महिन्यांचा काळ लोटूनही खड्डे बुजविण्याच्या कामांनी वेग पकडला नाही. परिणामी, विभागातील अनेक रस्ते आजही खड्डेमय आहेत. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार भागांतील रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी हा दौरा होता. दौरा झाल्यानंतर त्यांनी विभागातील १९ कार्यकारी अभियंत्यांना तातडीने सर्व रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. खड्डेमय रस्त्यांवरून जीव मुठीत धरून वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागते. रस्त्यांची ही अवस्था अपघातास कारक ठरल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. मागील काही वर्षांत खड्डय़ामुळे अपघात होऊन काही वाहनधारकांना प्राण गमवावे लागले. खड्डेमय रस्त्यामुळे असे प्रकार घडू शकतात, हे लक्षात घेऊन देशमुख यांनी कार्यकारी अभियंत्यांना सूचना केल्या आहेत. दौऱ्यात अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे पाहावयास मिळाले. यामुळे वाहनधारक व प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. खड्डय़ांमुळे जीवघेणे अपघातही घडू शकतात. तसेच कंबरदुखी व मणक्याचे विकार जडू शकतात. यामुळे विभागातील रस्ते खड्डेमुक्त करण्याकडे सर्व कार्यकारी अभियंत्यांनी कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. आपण खड्डेमुक्त रस्त्यांची अपेक्षा करतो, मात्र ते बुजविण्याची दक्षता मात्र घेत नाही, असा टोलाही देशमुख यांनी लगावला आहे. कार्यकारी अभियंते रस्ता वापरण्याबाबत संवेदनशील नाहीत. यामुळे रस्तेदुरुस्तीच्या कामात दिरंगाई चालणार नाही. विभागातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामात प्राधान्य द्यावे, असे सूचित केले आहे. या कामात दिरंगाई झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या कार्यशैलीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पत्राद्वारे बोट ठेवण्यात आले आहे.