गोवा व पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांचा पनवेलपर्यंत अडखळणारा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी १ हजार २०० कोटी रुपये खर्च करून पुनर्बाधणी करण्यात आलेल्या सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे आढळून आले आहेत. या मार्गावरील सीबीडी खिंडीच्या अलीकडे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर तर संततधार पावसाने खड्डय़ांची रांग लावली असून एका ठिकाणी तर वाहनचालकांना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. हीच स्थिती शिरवणे व सानपाडा येथील उड्डाणपुलांची आहे.
२३ किलोमीटर अंतराच्या सायन-पनवेल मार्गाची उभारणी आणि त्यावरील रामायण राज्यात चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. या मार्गावरील टोलनाक्याचे कारण पुढे करून येथील काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या मार्गावरील टोल माफ करण्याचे मोठे आव्हान ठाकूर यांच्यासमोर होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी या मार्गावर १ हजार २०० कोटी रुपये खर्च झाले असले तरी हा आकडा १८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या मार्गावरील टोल माफ कसा केला, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला असून त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. अशा या टोलचा हक्क मागणाऱ्या सायन-पनवेल टोल कंपनीने उभारलेल्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डय़ांचे राज्य पसरले आहे. सीबीडी खिंड उड्डाणपुलाजवळ तर खड्डे वाचविताना अनेक वाहनांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडीचे दृश्य तयार झाले होते. हीच स्थिती शिरवणे पुलावर असून ती गतवर्षीपेक्षा बरी आहे. या मार्गावर पावसाच्या पाण्याची तळी तयार झाली असून वाहन चालविताना स्पीड बोट चालवत असल्याचा आनंद वाहनचालकांना घ्यावा लागत आहे. तळी साचणाऱ्या मार्गावर पाण्याला योग्य निचरा न दिल्याने ही तळी साचली आहेत.