ठाणे शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे तसेच ऊर्जा कार्यक्षम एलईडी दिव्यांचे पथदिवे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्यासंबंधीचे वेगवेगळे प्रस्ताव नऊ प्रभाग समिती स्तरांवर केले आहेत. शहरातील अन्य भागात अशाच प्रकारचे पथदिवे बसविण्यास महापालिकेने सुरू केले असून या नव्या प्रस्तावामुळे येत्या काही महिन्यात शहरातील मागासवर्गीय वस्त्या एलईडीच्या सफेद दिव्यांनी उजळून निघणार आहेत. हे सर्वच प्रस्ताव येत्या शनिवार होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावर मंजुरीसाठी आणण्यात आले आहेत.
ठाणे शहरात यापूर्वी पथदिव्यांमधून पिवळसर रंगाचा प्रकाश पडत असल्यामुळे रस्ते तसेच वस्त्यांमध्ये अंधारमय वातावरण असायचे. त्यामुळे महापालिकेने शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून अशाप्रकारचे पथदिवे शहरात बसविण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू केले आहे. एलईडी दिव्यांमुळे रस्ते तसेच वस्त्यांमध्ये पांढरा शुभ्र प्रकाश पडतो आणि यापूर्वीच्या दिव्यांपेक्षा एलईडी दिव्यांच्या दुरुस्तीचा खर्चही कमी असतो. या पथदिव्यांचे आयुष्यमान सुमारे १५ ते २० वर्ष असते. तसेच यापूर्वीच्या दिव्यांपेक्षा एलईडी दिव्यांमुळे सुमारे ५० ते ६० टक्के विजेची बचत होते, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात मागासवर्गीय वस्त्या असून त्याठिकाणी महापालिकेमार्फत पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यात येतात. या वस्त्यांमध्येही आता अत्याधुनिक पद्धतीचे तसेच ऊर्जा कार्यक्षम एलईडी पथदिवे बसविण्यात येणार असून या कामासाठी मागासवर्गीय निधी खर्च करण्यात येणार आहे.
वर्तकनगर, कोपरी, नौपाडा, रायलादेवी, वागळे इस्टेट, उथळसर, माजीवाडे-मानपाडा, कळवा, मुंब्रा या नऊ प्रभाग समिती स्तरांवर या संबंधीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून हे सर्वच प्रस्ताव शनिवारच्या सर्वसाधरण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत.
पथ दिव्यांसाठी लागणारा निधी
प्रभाग समिती     निधी
वर्तकनगर         ५६,६०,१९२
कोपरी        ३७,२८,८५३
नौपाडा         ३२,४३,२९०
रायलादेवी         १,०१,२५,७०१
वागळे        ३९,९५,५३१
उथळसर         १५,०९,६९८
मानपाडा        ७२,२५,५३६
मुंब्रा        २८,९२,८९६
कळवा        १,०७,९०,०३८