पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर शिवसेना आमदार अनिल कदम आणि पी अॅण्ड जी कंपनीतील महिला कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीच्या पाश्र्वभूमीवर, सोमवारी शिवसेनेतर्फे निफाड येथे विशाल मोर्चा काढून आमदारांविरुद्ध दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व टोल नाके बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला. हजारो ग्रामस्थांसह निघालेल्या मोर्चात शिवसेनेबरोबर काँग्रेसचे व तिसरा महाजचे काही पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी आ. कदम हे स्वत: न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. त्यानंतर पिंपळगावच्या प्रवेशद्वारावर मोटारीवर उभे राहून जाहीर सभा घेत त्यांनी शक्ती प्रदर्शन केले.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पाठराखण झाल्यानंतर शिवसेनेने पी अॅण्ड जी टोल कंपनीच्या कार्यशैलीच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ओळखपत्र मागितल्यामुळे संतापलेल्या कदम यांनी टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. त्यावरून कदम यांच्याविरुद्ध विनयभंगासह वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात होते. दरम्यानच्या काळात कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढून आमदारांनी राजीनामा देऊन संबंधित महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, कदम यांनी आमदारकीचा राजीनामा पक्ष प्रमुखांकडे सादर केला असला तरी कदम यांच्यावर कोणताही अन्याय केला जाणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. पक्षाकडून ही भूमिका घेतली गेल्याने सावरलेल्या कदम समर्थकांनी टोल कंपनीच्या विरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार केल्याचे पहावयास मिळाले.
निफाड बाजार समितीच्या आवारातून निघालेल्या विशाल मोर्चाचे नेतृत्व दिंडोरीचे आ. धनराज महाले, माजी आमदार कल्याणराव पाटील, पिंपळगाव बाजार समितीचे जयदत्त होळकर, सत्यभामा गाडेकर आदींनी केले. काँग्रेसचे काही पदाधिकारी तसेच तिसरा महाजचे नगरसेवकही मोर्चात सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालयालगतच्या शिवाजी चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी पी अॅण्ड जी टोल कंपनीच्या कार्यशैलीवर टीकास्त्र सोडण्यात आले. कदम यांच्याविरुद्ध दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा त्वरित मागे घेण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. टोल नाक्यावर जी घटना घडली, तिचा अर्धा भाग कंपनीने प्रसारमाध्यमांकडे सोपविला. त्यानंतर खोटी तक्रार देऊन आमदारांना अडकविण्याचा प्रयत्न केला. यामुळे कदम यांनी आमदारकीचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. टोल कंपनीने आमदारांच्या विरोधातील तक्रार मागे न घेतल्यास पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यासह शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात जे जे टोल नाके आहेत, ते सर्व बंद पाडले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
आ. कदम यांना जामीन आणि जाहीर सभा
टोल कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यामुळे आ. अनिल कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे संकेत पोलिसांनी दिले असताना सोमवारी स्वत: कदम हे पिंपळगाव बसवंत येथील न्यायालयात हजर झाले. यावेळी न्यायालयाच्या आवारात हजारो समर्थकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला. न्यायालयात वकीलांनी कदम यांची बाजू मांडली. न्यायालयाने कदम यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. या बाबतची माहिती आ. कदम यांनी दिली. न्यायालयातून बाहेर पडल्यावर हजारो समर्थकासह ते पिंपळगावच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. या ठिकाणी त्यांची जाहीर सभा झाली. मोटारीवर उभे राहून आ. कदम यांनी भाषण केले. टोल नाक्याच्या विरोधातील संघर्ष पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.