सोलापूर जिल्ह्य़ातील सध्याची दुष्काळी परिस्थिीची तीव्रता लक्षात घेता दुष्काळग्रस्तांची तहान भागविण्यासाठी वरचे वर टँकरची मागणी वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात टँकर पाणी भरत असलेल्या प्रमुख पाच स्रोतांच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित न करता चोवीस तास सुरू ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व प्रशासनाची बैठक घेतली. त्या वेळी टँकरने पाणी भरण्यासाठी अस्तित्वात असलेल्या पाच स्रोतांच्या ठिकाणी वीजपुरवठा केवळ १६ तास होत असल्याची अडचण सांगण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत अक्कलकोट शहरासह पाच प्रमुख पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी अहोरात्र २४ तास वीजपुरवठा सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
चारा छावण्यांच्या खर्चाच्या पैशात अर्धा टक्का खर्च प्रशासकीय कामांसाठी ठेवण्याची तरतूद केली जाणार असून त्याबाबतचे आदेश लवकरच काढले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच जिल्ह्य़ासाठी चारा डेपोचे देय असलेली साडेआठ कोटींची रक्कम तातडीने अदा करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या बैठकीत पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांच्यासह शेकापचे नेते गणपतराव देशमुख, दिलीप सोपल, बबनराव शिंदे, भारत भालके, दिलीप माने, प्रणिती शिंदे, श्यामल बागल,सिद्रामप्पा पाटील आदी लोकप्रतिनिधींनी चर्चा उपस्थित केली. या वेळी महापौर अलका राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते.