उजनी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने मुंबईत आझाद मैदानावर गेल्या ९५ दिवसांपासून आंदोलन करूनदेखील त्याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी ‘पोतराज’ होऊन स्वत:वर कोडे मारून घेतले. हे आंदोलन वर्षां व देवगिरी बंगल्यासमोर करण्यासाठी निघाले असता त्यांना वाटेतच पोलिसांनी रोखून अटक केली.
सोलापूर जिल्ह्य़ात उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक भीषण झाली असून त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसला आहे. उजनी धरणातून उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडावे अशी जनहित शेतकरी संघटनेची मागणी आहे. या प्रश्नावर देशमुख व त्यांचे सहकारी मुंबईच्या आझाद मैदानावर अनेक दिवसांपासून आंदोलनास बसले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुष्काळग्रस्तांची असभ्य व अश्लिल भाषेत खिल्ली उडवून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले होते. या पाश्र्वभूमीवर देशमुख यांचे आंदोलन लक्षवेधी ठरले आहे.
आझाद मैदानावर आंदोलन सुरू करून ९५ दिवसांचा कालावधी उलटला तरी शासनाकडून केवळ आश्वासनांपलीकडे काहीही पदरात पडले नाही. गेल्या २२ मार्च रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. परंतु प्रत्यक्षात पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. केंद्रीय पातळीवरील नेते व राज्य शासनातील जबाबदार मंत्री दुर्लक्ष करीत असल्याने हे आंदोलन चिघळले आहे.
दरम्यान, या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून प्रभाकर देशमुख व त्यांचे सहकारी गुरुवारी आझाद मैदानावरून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यासमोर पोतराज होऊन स्वत:वर कोडे मारून घेण्याचे आंदोलन करण्यासाठी मार्गस्थ झाले. त्यांच्यासमवेत मरिआईवाले होते. हे लक्षवेधी आंदोलन वर्षां व देवगिरी बंगल्यासमोर होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना रोखले व अटक केली. प्रभाकर देशमुख यांच्यासह दत्तात्रेय कदम, धोिडराम िनबाळकर, विलास जाधव आदींना अटक करण्यात आली.
उजनी धरणातील पाणी उजव्या व डाव्या कालव्यात सोडावे, दुष्काळी स्थितीत इतर धरणांप्रमाणे उजनी धरणातही समान पाणीसाठा ठेवावा, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्य़ातून सोडलेले चार टीएमसी पाण्यापैकी एक टीएमसी पाणीदेखील उजनी धरणात पोहोचले नाही. उरलेले पाणी कोठे गेले, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, उजनी धरणात साठलेल्या सुमारे ५० हजार कोटी किमतीच्या वाळूमिश्रित गाळाचा लिलाव करून कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासह अन्य अर्धवट सिंचन योजना मार्गी लावाव्यात अशा विविध मागण्यांसाठी आपले आंदोलन सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. या प्रश्नावर सोलापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येत्या कार्तिकी यात्रेत पंढरपूरला विठ्ठलाच्या महापूजेसाठी येऊ देणार नाही. त्यावेळी लाखो वारकरी व शेतकऱ्यांचे आंदोलन करू, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.