माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे धृतराष्ट्राप्रमाणे केवळ आपल्या मुलांचे हितच पाहतात. तालुक्यातील अन्य कार्यकर्त्यांच्या हिताकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे कंटाळून आपण काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण प्रवेश केल्याचे निलंग्यातील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सांगितले.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. पाटील हे सावरी गावचे २५ वर्षांपासून सरपंच होते. युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, औराद बाजार समिती सभापती, पं. स. सदस्य ही पदे त्यांनी भूषविली. काँग्रेस पक्षात राहून अनेक वर्षे काम केले. मात्र, तेथे निलंगेकर कुटुंबातील घटकांव्यतिरिक्त कोणाच्या हिताचा विचार होत आहे, असे दिसले नाही. निलंगेकरांच्या नावाने साखर कारखाना उभा राहणार या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे समभाग खरेदी केले. अनेक मुलांना नोकरीवर घेण्याचे आमिष दाखवले गेले. त्यांचे विवाह जुळले. आता मुलेबाळे झाली तरीही कारखाना चालू झाला नाही. निलंगेकरांनी घरची मालमत्ता समजून साखर कारखान्याची वाट लावली. गावोगावच्या पिठाच्या गिरण्या चांगल्या चालत आहेत. मात्र, मुख्यमंत्रिपद भूषविलेल्यांच्या नावाने काढला गेलेला साखर कारखाना भंगारात विकण्याची वेळ आली आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
निलंगेकरांनी संजय गांधी निराधार योजनेचे दोन्ही तालुक्यांचे अध्यक्षपद आपल्या मुलालाच दिले. महिला बालकल्याण विकासचे सदस्यही कार्यकर्त्यांला दिले जात नाही. स्वत:च्या मुलाबरोबर ‘पीए’लाही पदे दिली जातात. निलंगेकरांचे नेतृत्व आता कालबाह्य़ झाले असून कंटाळून आपण राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लातूर जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले, प्रदेश सरचिटणीस राजपाल शिंदे या वेळी उपस्थित होते.