गर्भारपणाच्या तिसऱ्या टप्प्यात असलेल्या गर्भवतींसाठी राज्य सरकारकडून स्वाइन फ्लूच्या लस मोफत उपलब्ध करण्यात आल्या असल्या तरी आतापर्यंत केवळ ३४ गर्भवतींनीच ही लस टोचून घेतली आहे. पालिकेच्या केवळ एकाच रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध असल्याने लस वितरणावर मर्यादा येत असल्याने गुरुवारपासून ओशिवरा, प्रभादेवी व भांडुप येथील प्रसूतिगृहांमध्ये स्वाइन फ्लू लस देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
स्वाइन फ्लू हा इतर विषाणू संसर्गाप्रमाणेच असला तरी लहान मुले, वृद्ध- दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्ती तसेच गर्भवती स्त्रिया यांच्यामध्ये या विषाणूंमुळे गंभीर स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. स्वाइन फ्लूची लस टोचल्यानंतर साधारण पंधरा दिवसांमध्ये ७० टक्के लोकांमध्ये प्रतिबंधात्मक क्षमता निर्माण होते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. पाच वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूच्या लस टोचून घेण्याविषयी डॉक्टरांच्या मनातही साशंकता होती. मात्र आता स्वाइन फ्लूची लस देण्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागानेच ठरवले आहे. मुंबईसह आणखी सहा शहरांमध्ये सहा महिने पूर्ण झालेल्या गर्भवतींना ही लस देण्याचे ठरले होते. मात्र मुंबईतील स्वाइन फ्लूच्या साथीचा प्रसार पाहता ३० जुलपासून ही लस मुंबईतील पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली. मात्र कस्तुरबा रुग्णालयात संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांशी संपर्क येण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक गर्भवती ही लस घेण्यासाठी येत नाहीत, असे मत एका आरोग्य अधिकाऱ्याने व्यक्त केले. त्यामुळे आतापर्यंत केवळ ३४ गर्भवतींनीच ही लस टोचून घेतली आहे.
गर्भवतींना स्वाइन फ्लूचा धोका लक्षात घेऊन अधिकाधिक स्त्रियांपर्यंत ही सुविधा पोहोचवण्यासाठी आता पालिका ओशिवरा, प्रभादेवी व भांडुप येथील प्रसूतिगृहांमध्येही ही लस देण्यात येईल. त्याचप्रमाणे पालिकेच्या सर्व प्रसूतिगृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे येत असलेल्या गर्भवती स्त्रियांना या लसीविषयी माहिती देण्याचे व समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत, असे संसर्गजन्य आजार विभाग प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद पाहून तीन महिन्यांवरील गर्भवती स्त्रिया, वृद्ध तसेच आजारी व्यक्तींनाही मोफत लस दिली जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, लातूर व औरंगाबाद या शहरांमध्ये ही लस उपलब्ध होईल. सात शहरांत दहा हजार लसींचा पुरवठा करण्यात येणार असून प्रतिसादानुसार टप्प्याटप्प्याने एक लाख डोस वितरित करण्यात येतील.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant women are not reply for swine flu vaccines
First published on: 13-08-2015 at 02:37 IST