राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने मराठीचा झेंडा उंचावणारा मराठी चित्रपट आता खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर पोहोचायला सुरुवात झाली आहे. ‘पुणे ५२’, ‘बालक-पालक’ या चित्रपटांपाठोपाठ आता ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटानेही महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये आपले खेळ सुरू केले आहेत. महाराष्ट्रात येत्या शनिवारी आपले पन्नास दिवस पूर्ण करणारी ही ‘प्रेमाची गोष्ट’ शुक्रवारपासून बंगळुरूमध्येही प्रदर्शित होत आहे.
बंगळुरूमधील तीन चित्रपटगृहांत या चित्रपटाचा प्रत्येकी एक खेळ होणार आहे. त्याशिवाय बडोदा आणि अमेरिकेतील काही शहरांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार चालू असल्याचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सांगितले.
‘प्रेमाची गोष्ट’ प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच सर्वच माध्यमांनी या चित्रपटाचा विषय आणि चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत केली. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता २३ मार्च रोजी चित्रपट प्रदर्शित होऊन ५० दिवस पूर्ण होत आहेत. या पन्नास दिवसांत चित्रपटाची लोकप्रियता वाढतच असून ही खरोखरच सुखावह बाब आहे, असे राजवाडे म्हणाले.
हा चित्रपट सध्या महाराष्ट्रभरात १७ पडद्यांवर दाखवण्यात येत आहे. मात्र या आठवडय़ापासून यात नऊ चित्रपटगृहांची वाढ होणार आहे. पन्नास दिवस उलटत असतानाही गेल्या शनिवार-रविवारी पुण्यात तीन चित्रपटगृहांत खेळ हाऊसफुल्ल होता. मुंबईत ‘प्लाझा’मध्येही ६० टक्क्यांपेक्षा जास्त तिकिटे विकली गेली होती. आता पीव्हीआर आपल्या काही चित्रपटगृहांत हा चित्रपट पुन्हा दाखवणार आहेत. त्याशिवाय गिरगावातील सेंट्रल प्लाझामध्येही चित्रपटाचा खेळ होणार आहे.