शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच फळे लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने फळे व भाजीपाल्यावरील आडतदर कमी केल्याची माहिती सभापती तथा माजी खासदार देविदास पिंगळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे उत्पादकांना भाजीपाला व इतर सर्व प्रकारच्या फळांसाठी एक टक्के तर डाळिंब उत्पादकांना दोन टक्के आडतीचा खर्च कमी झाला आहे.
राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये भाजीपाला व फळे या नाशवंत शेतीमालाचे आडतदर शेकडा सहा टक्के प्रमाणे लागू करण्याचे परिपत्रक पणन संचालकांनी जारी केले होते. त्यास अनुसरून जिल्हा उपनिबंधकांनी कोणत्याही नियंत्रित शेतीमालावर सहा टक्क्यांपेक्षा जास्त आडतदर असलेले नियंत्रित शेतीमालापैकी सर्व प्रकारची फळे, डाळिंब, पालेभाज्या व फळभाज्या यांच्यासाठी सात ते आठ टक्के प्रमाणे आडतदर लागू होते. नाशिक बाजार समितीने सभापती पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची तातडीची बैठक घेऊन उपरोक्त निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना शेतीमालापासून आर्थिक लाभ मिळावा तसेच फळ शेतीला प्रोत्साहन देण्याचा हेतू समोर ठेवून शासनाचा आदेश लक्षात घेत शेकडा सहा टक्के प्रमाण आडत कपात करण्याचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच बाजार समितीने १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष अमलबजावणीही सुरू केली आहे. त्यामुळे भाजीपाला व इतर सर्व प्रकारची फळे उत्पादक शेतकऱ्यांना एक टक्का व डाळिंब उत्पादकांना दोन टक्के प्रमाणे आडतीचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ होणार असल्याचे पिंगळे यांनी म्हटले आहे.