कचऱ्यातून सोने, टाकाऊतून टिकाऊ, सुंदर कलाकृती असे म्हणत काष्ठशिल्पकाराच्या कल्पनाशक्तीलाही दाद दिली जाते. असाच गौरव जिल्हा कारागृहातील एका बंद्याने प्राप्त के ला आहे. १५ महिन्यांपूर्वी ५८ वर्षीय आरोपी गजानन बावणे या कारागृहात आला. पवनार-खारी या गावी तो वेल्डिंग, तसेच फर्निचरचे काम करायचा. कारागृहातील भट्टीत जाळ्ण्यासाठी आलेल्या लाकडांत पशुपक्ष्यांच्या प्रतिमा जाणवल्या आणि त्याच्या कल्पनांना पंख फुटले. तो म्हणाला, प्रारंभी कारागृह अधीक्षक अशोक जाधवांची भीती वाटायची. लवकरच त्यांचा आदर वाटू लागला. या जळाऊ लाकडातून मी पशुपक्षी बनवू का असे विचारल्यावर त्यांनी होकार दिला. साहित्यही मिळवून दिले.  कारागृहात झालेल्या गांधी विचार मंचाच्या विचारांच्या भांडवलावर काही बनवावे, असे वाटत होते. लाकडांचा आकार बघत मी त्यांना पक्षी, साप, भुंगा, गरूड, खिराडी, असे रूप दिले. एका घरटय़ात पक्ष्यांची अंडीही ठेवली. यातून अस्तित्वाची झुंज या कल्पनेचे काष्ठशिल्प तयार झाले. पक्ष्यांची अंडी आहेत ती मिळविण्याकरिता साप फणा काढून जिभल्या चाटत तयार आहे. दुसऱ्या बाजूला गरूड झडप घालण्याच्या तयारीत आहे. अन्य पक्षी भेदरून बघत आहेत. तसेच झाडाच्या आकृतीतील शिल्पात ‘जगा आणि जगू द्या’ या भावना मी पेरल्या. येथे साप आहे, गरूड आहे,  पक्षी आहेत, खार आहे, सारे राग द्वेष विसरून एकमेकांकडे कौतुकाने पाहत आहेत. एक लाकडी ठोकळा उरला. त्याच्यातून २ गरूड नुकतेच बनविले. अधीक्षकांना दाखविले. त्यांनी कौतुक केले. तसेच वाघोबांचे डोके ही तयार केले आहे. हे करता करता मी बदलत आहे, असे मलाही वाटते. आता चुका दुरुस्त कराव्या, राग द्वेषाला तिलांजली द्यावी, प्रेमाने वागावे, असे पुन:पुन: वाटू लागले आहे.