साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या प्रसिद्ध प्रियदर्शिनी पुरस्काराला आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येत आहे. मराठी साहित्यासाठी दिला जाणारा प्रियदर्शिनी साहित्य पुरस्कार यापुढे ‘बाळासाहेब ठाकरे मराठी साहित्य पुरस्कार’ या नावे दिला जाईल.
‘प्रियदर्शिनी अकादमी’तर्फे १९८४ पासून हिंदी, सिंधी आणि मराठी भाषेतील साहित्यासाठी पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी एका मराठी साहित्यिकाला हा पुरस्कार देण्यात येतो. २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आता मराठी साहित्यासाठी देण्यात येणारा प्रियदर्शिनी पुरस्कार हा बाळासाहेबांच्या स्मरणार्थ दिला जाईल. मराठी भाषेच्या सन्मानासाठी व प्रसारासाठी बाळासाहेबांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे आता या पुरस्काराचे नाव ‘बाळासाहेब ठाकरे मराठी साहित्य पुरस्कार’ असे करण्यात आले आहे, असे अकादमीचे प्रमुख नानिक रुपानी यांनी जाहीर केले.