मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक र्निबधामुळे अगोदर रद्द करण्यात आलेली दहीहंडी आता वेळेअभावी उभारता येणार नसल्याने दहीहंडी उत्सव मंडळांची मोठी पंचाईत झाली असून नवी मुंबईतील अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत मंडळांनी दहीहंडी रद्द केल्या आहेत. यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांची ऐरोलीतील दहीहंडी साजरी होणार असून त्यांचे प्रतिस्पर्धी अनंत सुतार, एम के.मढवी यांच्या दहीहंडय़ा रद्द झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व दहीहंडय़ाचे चित्रीकरण करण्याचे आदेश पोलीस आयुक्त के. एल.प्रसाद यांनी दिले आहेत.
मुंबई, ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही काही मानाच्या दहीहंडय़ा मागील काही वर्षांपासून साजऱ्या होऊ लागल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने २० फुटापेक्षा जास्त उंचीवर मर्यादा आणि १८ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीमध्ये सहभागी न होण्याची अट यामुळे अनेक गोविंदा मंडळांनी आपल्या प्रभागातील उत्सव रद्द केले आहेत. त्यात नेरुळमधील सिडको संचालक नामदेव भगत, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, कोपरखैरणे येथील नववैभव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष युवा सेना नेते वैभव नाईक, ऐरोली येथील माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेवक एम. के. मढवी, सभागृह नेते अनंत सुतार यांनी न्यायालयाच्या कडक र्निबधाचा निर्णय ऐकून रद्द केल्या, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्याचे जाहीर केल्यानंतर या मंडळाची मोठी पंचाईत झाली. दोन दिवसात तयारी करणे शक्य नसल्याने ह्य़ा रद्द केलेल्या दहीहंडीच्या जागी आता छोटय़ा हंडय़ा बाधून तो साजरा केला जाणार आहे. या दहीहंडीत १२ वर्षांआतील गोविंदांना सहभागी होण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळाच्या उत्सवावर पोलिसाच्या कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. नवी मुंबईतील ऐरोली ते पनवेल या भागात सुमारे २५६ दहीहंडी उत्सव साजरे केले जात असून यातील अर्धे उत्सव या वर्षी रद्द करण्यात आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th Aug 2014 रोजी प्रकाशित
दहीहंडी उत्सव मंडळाची पंचाईत
मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक र्निबधामुळे अगोदर रद्द करण्यात आलेली दहीहंडी आता वेळेअभावी उभारता येणार नसल्याने दहीहंडी उत्सव मंडळांची मोठी पंचाईत झाली असून नवी मुंबईतील अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत मंडळांनी दहीहंडी रद्द केल्या आहेत.
First published on: 16-08-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem of dahi handi organizer due to order of high court