खंडणी आणि हल्ल्याच्या गुन्ह्यातील एका कुख्यात गुंडाला गुन्हे शाखा ११ च्या पथकाने अगदी फिल्मी पद्धतीने गुरुवारी रात्री अटक केली. मोहसिन खान (२७) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर १२ गंभीर गुन्ह्य़ांची नोंद आहे.
गोरेगावच्या भगतसिंग नगर क्रमांक १ मध्ये मोहसिन खानची दहशत होती. त्याच्यावर खंडणी, मारामारी, हल्ला करणे आदी १२ गंभीर गुन्ह्य़ांची नोंद होती. त्यातच त्याला गोरेगाव पोलिसांनी तडिपारसुद्धा केले होते. परंतु या काळातही तो या भागात येऊन गुन्हे करत होता. पोलिसांनी त्याला यापूर्वी पकडण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. परंतु प्रत्येक वेळी तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी होत होता. पोलीस आले की तो लहान मुलांना बंधक बनवायचा आणि मग निसटून जायचा. अनेकदा तो पोलीस पकडायला आल्यावर खाडीत उडी टाकून पळून जायचा. गुरुवारी रात्री तो या भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा ११ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, शेख तसेच कोंडे, देसाई, सचिन कदम आणि अजित चव्हाण यांच्या पथकाने सापळा लावला. त्याच्या घराबाहेर पोलिसांनी सापळा लावला. पोलीस आल्याची कुणकुण लागताच त्याने घरामागे असलेल्या खाडीत उडी टाकून नेहमीसारखा पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला त्यापूर्वीच शिताफीने पकडले.