पं. शिवानंद पाटील स्मृती मैफल
शास्त्रीय संगीतातील गुणी गायक पं. शिवानंद पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त योजना प्रतिष्ठानतर्फे संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. पं. शिवानंद पाटील यांच्या पत्नी व शिष्या योजना शिवानंद यांचे गायन ऐकायला मिळणार असून त्यांना प्रकाश वगळ, गुरूनाथ घरत, उमेश मळिक हे कलावंत साथसंगत करतील. या मैफलीचे निवेदन किशोर सोमण करणार आहेत. मंगळवार, २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता साठय़े महाविद्यालय सभागृह, दीक्षित मार्ग, विलेपार्ले पूर्व येथे ही संगीत मैफल होणार असून तत्पूर्वी शिवानंद पाटील यांनी गायलेल्या शास्त्रीय गायनाची ‘शिवस्वर’ ही सीडी सारेगामा या म्युझिक कंपनीतर्फे प्रकाशन करण्यात येणार आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच भक्तीसंगीत, नाटय़संगीत, संगीत दिग्दर्शन अशा संगीताशी संबंधित विविध प्रकार सादर करणारे पं. शिवानंद पाटील यांच्या गाण्यांची ही सीडी आहे. गीता नायक, श्रीराम बापये, रामदास भटकळ, डॉ. विशेष नायक, पं. दुर्गा प्रसाद मझुमदार, पं. मधुकर जोशी असे विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
‘द फॅण्टसी वर्ल्ड’
वीरांगना सोनी यांच्या अमूर्त शैलीतील चित्रांचे प्रदर्शन ‘द फॅण्टसी वर्ल्ड’ २३ एप्रिलपासून  जहांगीर कला दालनात भरविण्यात येणार आहे. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी कॅन्व्हासवर अ‍ॅक्रिलिक माध्यमातून चितारलेल्या चित्रांमध्ये रंगसंगतीचा वैशिष्टय़पूर्ण वापर केला आहे. हे प्रदर्शन २९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
दुष्काळग्रस्त निधीसाठी संगीत मैफल
मराठवाडा परिवार आणि मंत्र फाऊण्डेशन या संस्थांच्या वतीने मराठवाडय़ातील दुष्काळ निवारण निधी संकलनासाठी २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता षण्मुखानंद सभागृहात संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सितार फंक’ हा संगीताचा चमू फ्यूजन संगीत मैफल सादर करणार आहे. पंचम निषाद क्रिएटिव्हने ‘सितार फंक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सुप्रसिद्ध सतार आणि झिटारवादक निलाद्रीकुमार, ड्रम्सवादक गीनो बँक्स, तबलावादक सत्यजित तळवलकर, बास गिटारवादक शेल्डन डिसिल्व्हा, कीबोर्ड वादक अ‍ॅग्नेलो फर्नाडिस हे कलाकार फ्यूजन संगीत मैफल रंगविणार आहेत.
‘हेवनली व्हिजन’
घनश्याम गुप्ता यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘हेवनली व्हिजन’ २४ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या कला दालनात भरविण्यात येणार आहे. कृष्णाचे अमूर्त शैलीतील चित्र, त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचे, लक्ष्मीचे, महावीरांचे चित्र अशी देवदेवतांची चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. ध्यानधारणा या विषयावर आधारित चित्रेही यात असून या प्रदर्शनाचे उद्घाटन २४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता राजीव कसट, विकाश मित्तेरसैन, देवांग देसाई, चंदन तहिलानी, शशी जालन, आयन मॅक्डोनाल्ड, शेखर गायकवाड, विनोद मलकानी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. २४ आणि २५ असे दोनच दिवस हे प्रदर्शन सकाळी १० ते सांयकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
वसंतराव देशपांडे संगीत सभा
वसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेतर्फे शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या अनोख्या मैफलींचे आयोजन करण्यात येते. २० व २१ एप्रिल रोजी बारा तास बारा गायक आपली कला सादर करणार असून हा अभिनव कार्यक्रम ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात २० रोजी दुपारी ४.३० ते ११.३० व गडकरी रंगायतन येथे २१ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत होईल. वसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेला १२ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त दोन दिवसांच्या मैफलींचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये भुवनेश कोमकली, चंद्रकांत लिमये, अमरेंद्र धनेश्वर, देवकी पंडित, सुहास व्यास, कौत्सुभ, कृष्णा बोंगाणे, स्वानंद भुसारी, अजय पोहनकर आदी गायक-गायिका सहभागी होणार आहेत.
‘प्रात:स्वर’मध्ये बासरीवादन  
भारतीय शास्त्रीय संगीतातील नवोदित, दिग्गज कलावंतांनी सादर केलेले पहाटेचे आणि सकाळच्या रागातील गायन लोकांना ऐकायला मिळावे या भूमिकेतून पंचम निषादतर्फे ‘प्रात:स्वर’ या विनामूल्य संगीत मैफलीचे आयोजन केले जाते. बंदिस्त सभागृहाऐवजी प्रभात रागांचे गायन रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील खुल्या प्रांगणात ऐकायला मिळतात. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहाय्याने २१ एप्रिल रोजी पहाटे ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या मैफलीत सुप्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी बासरीवादन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
‘तिने बेचैन होताना’चे प्रकाशन
झी मराठी वाहिनीवरील ‘राधा ही बावरी’ या लोकप्रिय मालिकेतील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या गाण्यांना गायक-संगीतकार मंदार आपटे याने स्वरसाज चढविला आहे. या गाण्यांच्या ‘तिने बेचैन होताना’ या अल्बमचे प्रकाशन शुक्रवार, १९ एप्रिल या दिवशी रात्री साडेआठ वाजता माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात होणार आहे. या मालिकेतील श्रुती मराठे व सौरभ गोखले ही आघाडीची जोडी तसेच दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. यावेळी या अल्बममधील गाणीही सादर होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे.