शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी विधान परिषदेत आ. जयंत जाधव यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना दिले.
वैद्यकीय अधीक्षक, मूत्रपिंड विकार तज्ज्ञ आणि हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञांसह इतर २२ विशेषज्ञांची पदे तसेच जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, नऊ वैद्यकीय अधिकारी यांसह इतर पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधीक्षक हे पद वर्षभरापासून रिक्त आहे. जिल्हा रुग्णालयामधील मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रशासन अधिकारी तसेच प्रथमश्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची २१ पैकी नऊ पदे रिक्त असून अधिपरिचारिका संवर्गातील १३, तृतीयश्रेणी अन्य नऊ तर चतुर्थश्रेणीची ५७ पदे रिक्त असल्याचेही आ. जाधव यांनी लक्षात आणून दिले.