सुदृढ नात्यांसाठी आयुष्यमान व कुणाल यांचा फॉम्र्युला
चित्रपट चालावा, म्हणून बॉलिवूडमध्ये कलाकार आजकाल वाट्टेल त्या थराला जाऊन प्रसिद्धी मिळवितात. विशेषत: अनेक वेळा एखाद्या गोष्टीवर आपले टोकाचे मत नोंदवणे, ही गोष्ट तर नेहमीचीच होऊन बसली आहे. सध्या ‘नौटंकी साला’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयुष्यमान खुराणा व कुणाल रॉय कपूर या दोघांचेही हेच तंत्र आहे. एकमेकांशी संबंध चांगले ठेवायचे असतील, तर जास्त भांडणे हवीत, असा यांचा नवाच सिद्धांत. त्यासाठी ते दाखला देतात तो एकमेकांमधील दोस्तीचा!
‘विकी डोनर’ या चित्रपटाद्वारे प्रकाशझोतात आलेला आयुष्यमान व ‘देहल्ली बेल्ली’ या चित्रपटात धम्माल भूमिका साकारणारा कुणाल सध्या ‘नौटंकी साला’ या चित्रपटात एकत्र आहेत. मैत्रीचे रहस्य विचारल्यावर त्यांनी हा भांडणाचा सिद्धांत मांडला. कुणालच्या मते आयुष्यमान हा उत्तम कलाकार आहे. त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मात्र नाती घट्ट होण्यासाठी आम्ही दोघेही सेट्सवर खूप भांडायचो. आमची भांडणे ठरलेली असायची.  पण त्यामुळेच आम्ही दोघे आज एकमेकांचे चांगले मित्र बनलो आहोत, असे कुणाल म्हणाला. आपल्या सहकलाकाराला समजून घेणे, त्याच्याशी मैत्री करणे हे विनोदी चित्रपटांमध्ये खूप आवश्यक असते, असे कुणालचे मत आहे.
आयुष्यमानचेही हेच म्हणणे आहे. या लहान-मोठय़ा भांडणांमधूनच आम्ही एकमेकांना ओळखायला शिकल्याचे तो सांगतो. आमची मैत्री आमच्या भांडणांमुळेच खूप मजबूत झाली आहे. आता ती टिकविण्यासाठी आणखी भांडणे आवश्यक आहे, असेही त्याने सांगितले. त्याशिवाय रंगभूमीवरील कुणालच्या कारकीर्दीविषयीही तो भरभरून बोलतो.