महापालिकेच्या प्रत्येक विभागात पारदर्शकता असावी आणि कामाचे नियोजन व्हावे यादृष्टीने प्रत्येक विभागाचे अंकेक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे तसा प्रस्ताव आयुक्तांना देण्यात आला असून पंधरा दिवसात त्या संदर्भात माहिती द्यावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिली.
महापालिकेचे अंकेक्षण होत असताना प्रत्येक विभागाचे सुद्धा अंकेक्षण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने बाजार विभागाचे अंकेक्षण सुरू करण्यात आले असून अन्य विभागाचे अंकेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहे. या संदर्भात आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून पंधरा दिवसात कर्मचाऱ्यांची सोय करण्यात यावी आणि अंकेक्षण सुरू करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. प्रत्येक विभागाचे अंकेक्षण झाल्यावर स्थायी समितीसमोर तो अहवाल ठेवण्यात येईल आणि त्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होईल. प्रत्येक विभागात अनियमितता असेल तर या अंकेक्षणामुळे त्यात सुधारणा होईल, असेही ठाकरे म्हणाले. बैठकीत सोलर वॉटर हिटर्सबाबत निर्णय घेण्यात आला असून त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. नागपूर शहर सोलर सिटी रूपाने विकसित करण्याच्या उद्देशाने सोलर वॉटर हिटर्सची सोय करण्यात येणार आहे. ५० टक्के सबसिडीसह त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. ५० टक्के राज्य सरकार आणि ५० टक्के नागरिकांकडून घेण्यात येणार आहे. याची मूळ किंमत १४ हजार ८०० रुपये असली तरी नागरिकांना मात्र ते सात हजार ४०० रुपयाला मिळणार आहे.
काँग्रेसनगर परिसरातील नाल्याच्या बांधकामासाठी आर.बी. यादव या कंत्राटदाराची निविदा महापालिकेकडे आली असता त्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. कंत्राटदार आर.बी. यादव यांच्या कामाबाबत किशोर गजभिये, बंडू तळवेकर आणि प्रशांत चोपडा यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे त्यांच्याकडे तूर्तास काम न देता त्यांच्या कामाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती तयार करण्यात आली असून त्यात गजभिये, तळवेकर आणि डॉ. चोपडा यांचा समावेश करण्यात आला. या तिघांनी चौकशी करून पुढच्या स्थायी समितीच्या बैठकीत तो अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहे. या शिवाय शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.