अक्कलपाडा धरण पूर्ण झाल्यानंतर ‘पांझरा बारमाही’ उपक्रमांतर्गत धुळे तालुक्यातील जुन्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी १८ कोटी रुपयांचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. शरद पाटील यांनी दिली. फड पद्धतीच्या सिंचनातून तालुक्यातील जुने बागायती क्षेत्र पुन्हा लाभक्षेत्रात आणण्याचा आपला संकल्प आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
तालुक्यातील विश्वनाथ व सुकवद येथे स्थानिक विकास निधीतून विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन असे कार्यक्रम आ. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, प्रा. अरविंद जाधव, कैलास पाटील आदी उपस्थित होते. पांझरा नदीवरील सर्व वितरिकांसाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून शेती सिंचनाखाली आणली जाणार आहे.
पांझरा नदीतील पाणी शेतीसाठी घेण्याकरिता ऑक्टोबर महिन्यापासून परवानगी मिळाली असून शेतकऱ्यांनी पाणी घेण्याबाबत विहित नमुन्यातील प्रस्ताव विभागाकडे सादर करण्याचे आवाहनही आ. पाटील यांनी केले.
विश्वनाथ येथे मारुती मंदिरासमोरील सभा मंडपासाठी तीन लाख, बाल उद्यानाच्या संरक्षक भिंतीसाठी अडीच लाख रुपये स्थानिक विकास निधीअंतर्गत देण्यात आले आहेत.
 याशिवाय पंचायत समितीच्या १३व्या वित्त आयोगांतर्गत आदिवासींसाठीच्या सामाजिक सभागृहाचे नूतनीकरण, विश्वनाथ ते सुकवद या रस्त्याच्या डांबरीकरणाची सुरुवात, खा. प्रतापदादा सोनवणे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन, सुकवद येथील आदिवासींसाठी बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन असे कार्यक्रम आ. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
विश्वनाथ आणि सुकवद ही दोन्ही गावे विकास कामांच्या दृष्टीने मागे राहिली होती. त्यांचा विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याचा आपला प्रयत्न आहे. सातरणे ते विश्वनाथ रस्ता दुरुस्तीसाठी २२ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून न्याहळोद ते विश्वनाथ रस्त्याच्या अपूर्ण कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात नाबार्ड योजनेंतर्गत ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.