कराड अर्बन बँकेच्या दुष्काळग्रस्त सभासदांसाठी शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या उपक्रमामुळे माणदेशामध्ये शुध्द माणुसकी अन् पाण्याचा झरा उसळल्याची भावना जनतेमध्ये आहे. बँकेने दाखविलेली ही सामाजिक बांधिलकी आदर्शवत व स्तुत्य अशीच असून, राज्यातील अन्य बँकांनी कराड अर्बनच्या या कार्याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी उपनिबंधक आंनद कटके यांनी केले.
कराड अर्बन बँकेने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दहिवडी व म्हसवड शाखा कार्यक्षेत्रातील सभासदांना पाच माणसांच्या कुटुंबासाठी २० लिटरचा शुध्द पाण्याचा एक जार (मिनरल वॉटर) आठवडय़ातून दोनदा घरपोच देण्याची सुविधा सुरू केली. या सुविधेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. सहायक सहकारी उपनिबंधक विकास जाधव, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष डॉ. राजीव आहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, बँकेचे सर्व संचालक, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, नगराध्यक्षा वैशाली लोखंडे, उपनगराध्यक्ष मारुती वीरकर, महेंद्र जोशी, राजकुमार सूर्यवंशी, नितीश दोशी, नितीन चिंचकर, अजित व्होरा, अमित माने, आप्पा पुकळे, डॉ. जितेंद्र तिवाटणे, सुनील पोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
आनंद कटके म्हणाले की, आजच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता कराड बँकेने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. याबाबत आपण सहकार आयुक्तांना माहिती पाठविणार असून, कराड अर्बनचा पाणी वाटपाचा हा आदर्श पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यभर राबविला जावा यासाठी आपण पाठपुरावा करू.
डॉ. सुभाषराव एरम म्हणाले की, कराड अर्बन बँक ही शताब्दीकडे वाटचाल करणारी बँक असून तिने आजवर भूकंप, दुष्काळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सभासदांना आवश्यक ती मदत केली आहे. दहिवडी व म्हसवड शाखा परिसरातील सभासदांच्या आरोग्याचा विचार करून बँकेने पाण्याचे जार घरपोच देण्याची योजना राबविली आहे.
सुभाषराव जोशी यांनी या अभिनव योजनेचा लाभ सभासदांनी घ्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक व स्वागत दिलीप गुरव यांनी केले. उपाध्यक्ष डॉ. राजीव आहिरे यांनी आभार मानले.