हिंदी चित्रपटसृष्टीत आपापल्या चित्रपटांची प्रसिद्धी करण्यासाठी निर्माते कोणत्या थराला जातील, काहीच सांगता येत नाही. त्यात निर्मात्याचे नाव एकता कपूर असेल, तर मग बघायलाच नको! विविध मालिकांच्या निर्मितीद्वारे छोटय़ा पडद्याची ‘महाराणी’, असा किताब मिळवणारी एकता निर्माती म्हणून बॉलीवूडमध्येही स्थिरावली आहे. मात्र आपल्या आगामी ‘एक थी डायन’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ती वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहे. यातील एक नवीन क्लृप्ती म्हणजे एकता आता स्वत: एका छोटेखानी भूमिकेत छोटय़ा पडद्यावर झळकणार आहे. त्यासाठी ती थेट विशाल भारद्वाजकडून अभिनयाचे धडेही गिरवत आहे.
झाले असे की, ‘एक थी डायन’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एकता सध्या जिवाचे रान करत आहे. त्यासाठी ‘डायन’मधील कलाकारांना घेऊन तिने कुंभमेळ्यातही हजेरी लावली. त्याचाच एक भाग म्हणून एकताने ‘एक थी नायिका’ हा खास शो छोटय़ा पडद्यासाठी तयार केला आहे. या शोमध्ये छोटय़ा पडद्यावरील आठ नायिकांचा सहभाग आहे. एकता आणि विशाल हे दोघेही या शोमध्ये छोटेखानी भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
आतापर्यंत अभिनयापासून नेहमीच दूर पळणारी एकता अचानक या मार्गाला कशी लागली, अशी चर्चा सध्या सुरू आहे. पण त्याचेही उत्तर एकतानेच दिले आहे. आपण खूपच वाईट अभिनय करत असल्याने आपल्याकडून फार अपेक्षा करू नका. एखाद्या झाडाभोवती गाणी म्हणत फेऱ्या मारणे आपल्याला कधीच जमणार नाही.
त्यापेक्षा आपण झाड म्हणून उभे राहणे पसंत करू. किमान त्या झाडाला बोलावे लागत नाही, असे एकताचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे भल्या भल्या अभिनेत्यांकडून अभिनय करून घेणाऱ्या विशाल भारद्वाजकडूनच एकता अभिनयाचे धडे घेत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2013 रोजी प्रकाशित
छोटय़ा पडद्याची ‘महाराणी’ आता मोठय़ा पडद्यावर
हिंदी चित्रपटसृष्टीत आपापल्या चित्रपटांची प्रसिद्धी करण्यासाठी निर्माते कोणत्या थराला जातील, काहीच सांगता येत नाही. त्यात निर्मात्याचे नाव एकता कपूर असेल, तर मग बघायलाच नको!

First published on: 10-03-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queen of small screen now on big screen