कोल्हापूर जिल्ह्य़ास आठवडाभर पावसाने झोडपून काढल्याने राधानगरी धरण तुडुंब भरले असून धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे मंगळवारी उघडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७ हजार क्युसेक, तर वीजगृहातून २२०० क्युसेक्सचा असा ९ हजार २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संपूर्ण आठवडाभर जिल्ह्य़ात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. धरण क्षेत्रात तर धुवांधार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे राजर्षी शाहूकालीन राधानगरी धरण मंगळवारी सकाळी ९ वाजता काठोकाठ भरले. तुडुंब भरलेल्या धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. प्रथम तीन क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला.पाठोपाठ अन्य दरवाजे खुले झाले. सायंकाळी पाचपर्यंत ५ दरवाजे उघडले गेले. सुरूवातीला धरणाचे स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून ५ हजार क्युसेक्स विसर्ग होत होता, तर सायंकाळी तो ९ हजार २०० क्युसेक्सपर्यंत पोहचला.
जिल्ह्य़ातील बहुतांश धरणातील पाणीसाठा लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. यापूर्वी घटप्रभा, जांबरे,कोदे ही तीन धरणे पूर्णपणे भरली होती. आता राधानगरी धरणही पूर्ण भरले आहे. सध्या तेथे पाणीपातळी ३४७.९४ मीटर इतकी होती. अन्य धरणातील पाणीसाठा दक्षलक्ष घनमीटर याप्रमाणे- तुळशी ७५.०८ (९८.२९), वारणा ८२४.८७ (९७४), दुधगंगा ५९२ (७१२), कासारी ५८ (७८), कडवी ७१.२४ (७१.२४), कुंभी ६८ (७६), पाटगाव ८८.५२ (१०५.२४). जिल्ह्य़ातील पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, वारणा या प्रमुख नद्यांतील पाणीसाठय़ामध्ये वाढ झाली आहे.यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.पी.पाटील यांनी दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2013 रोजी प्रकाशित
राधानगरी धरण तुडुंब भरले पाच दरवाजे मंगळवारी उघडले
कोल्हापूर जिल्ह्य़ास आठवडाभर पावसाने झोडपून काढल्याने राधानगरी धरण तुडुंब भरले असून धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे मंगळवारी उघडले.

First published on: 24-07-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhanagari filled up 5 doors opened