आपल्या जिल्ह्यात मनसेला कसा प्रतिसाद आहे, आपल्या भागातून सक्षम उमेदवार कोण ठरू शकतो, गतवेळची स्थिती काय होती.. असे एक ना अनेक प्रश्न विचारत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची रणनिश्चिती करण्याच्या दृष्टीने जिल्हावार पदाधिकाऱ्यांशी चर्चेला सुरूवात केली. सायंकाळपर्यंत जवळपास २० ते २२ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करत राज यांनी तेथील राजकीय भूगोल समजावून घेतला.
आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी राज्यातील पक्षाचे आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संपर्कप्रमुख आदींच्या बैठकीला सुरूवात झाली. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठकीची व्यवस्था अलिशान अशा ‘एक्स्प्रेस इन’ हॉटेलमध्ये केली आहे. स्थापनेपासून या स्वरुपाची बैठक निदान नाशिकमध्ये तरी हॉटेलमध्ये झालेली नव्हती. पक्ष स्थापनेपूर्वी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी राज यांनी शासकीय विश्रामगृहास पसंती दिली होती. परंतु, आता परिस्थितीत बदल झाल्याचे बाहेरगावहून आलेल्या पदाधिकाऱ्यांना जाणवत होते. मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये महापालिकेवर पक्षाची सत्ता असून शहरात तीन आमदार आहेत. बैठकीच्या संयोजनातील हे बदल स्पष्टपणे अधोरेखीत झाले. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गिते यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील जिल्हास्तरावरील पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झाल्याने संयुक्त बैठक होईल, अशी काही जणांची धारणा होती. तथापि, राज यांनी पहिल्या दिवशी जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधणे पसंत केले. मनसेची स्थापना करण्याआधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेताना त्यांनी हाच फाम्र्युला वापरला होता. त्याची पुनरावृत्ती यावेळी झाल्याचे पहावयास मिळाले. जिल्हाध्यक्ष, संपर्कप्रमुख यांच्याशी चर्चा करून राज यांनी प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाची स्थिती जाणून घेतली. त्या त्या जिल्ह्यात मनसेला कसा प्रतिसाद आहे याची माहिती घेत लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार रिंगणात आल्यास काय स्थिती राहील अशी संबंधितांकडे विचारणा केली. आपल्या मतदारसंघातून सक्षम उमेदवार कोण असू शकतो याचीही चाचपणी करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी साधारणत: प्रत्येकी १० ते १५ मिनिटे त्यांनी चर्चा केली. सायंकाळपर्यंत २० ते २२ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतरही बैठकीचा सिलसिला सुरू होता.
गोदा उद्यानाच्या कामास आता फेब्रुवारीमध्ये सुरूवात
वेगवेगळ्या कारणांमुळे रेंगाळलेल्या गोदा उद्यानाच्या कामास फेब्रुवारीच्या अखेरीस सुरूवात होणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. रिलायन्स फाऊंडेशनमार्फत या उद्यानाच्या संकल्पनेचे सादरीकरण होऊन काही महिन्यांचा काळ उलटला तरी त्याचा श्रीगणेशा अद्याप झालेला नाही. या संदर्भात पत्रकार परिषदेत विचारणा झाल्यावर राज यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ते काम सुरू होईल असे संकेत दिले. नाशिक लोकसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवाराबद्दल मात्र त्यांनी मौन बाळगले. मागील निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार पराभूत झाला असला तरी विरोधी राष्ट्रवादीची त्याने पुरती दमछाक केली होती. नवख्या उमेदवाराने दिलेली ही लढत सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. नाशिकमध्ये मनसे कोणाला रिंगणात उतरविणार याची स्पष्टता त्यांनी केली नाही. गोदा उद्यानाच्या प्रकल्पाचे सादरीकरण होऊन बरेच महिने लोटले असले तरी त्यास सुरूवात झालेली नाही. या संदर्भात विचारणा झाल्यावर राज यांनी ते काम फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे सांगितले. शहरातील अस्वच्छता व अतिक्रमणाच्या प्रश्नावर त्यांनी स्थानिक पातळीवरील हे प्रश्न सोडविण्यास काही अडचण नसल्याचे सांगितले. अतिक्रमण मोहीम सुरू झाल्यावर मात्र नागरीक त्यास विरोध करतात, असे अप्रत्यक्षपणे त्यांनी सूचित केले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2014 रोजी प्रकाशित
चर्चेतील प्रतिसादाचे ‘राज’
आपल्या जिल्ह्यात मनसेला कसा प्रतिसाद आहे, आपल्या भागातून सक्षम उमेदवार कोण ठरू शकतो, गतवेळची स्थिती काय होती..

First published on: 10-01-2014 at 07:15 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thakrey in nashik