मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात काही कामे अर्धवट राहिल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी पिंपळगाव बसवंत गावालगत ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. सकाळी अकरा वाजता पिंपळगाव टोल नाक्याच्या पुढे कारने दुचाकीला धडक दिली. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नसले, तरी दुचाकीचे नुकसान झाले. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतापलेले ग्रामस्थ महामार्गावर उतरले. पोलिसांनी संबंधितांची समजूत काढल्यावर काही काळ रखडलेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे वेगवेगळ्या टप्प्यात विस्तारीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांसाठी भुयारी मार्ग वा उड्डाण पूल अशी व्यवस्था न केल्यामुळे या कारणावरून आजतागायत अनेकदा आंदोलने झाली आहेत. पिंपळगाव बसवंत येथे टोल नाक्याच्या पुढील बाजूला उड्डाण पुलास सुरुवात होण्याआधी महामार्गाचे काही काम पूर्ण करण्यात आले नसल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे.
ही बाब अपघातांना निमंत्रण देणारी ठरत असल्याची तक्रार केली जात आहे. गुरुवारी सकाळी या ठिकाणी पुन्हा अपघात झाला आणि स्थानिक संतप्त झाले. कारने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीधारक किरकोळ जखमी झाला. रखडलेले काम कंपनीने त्वरित पूर्ण करावे म्हणून वारंवार मागणी केली जात आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगितले जाते, परंतु टोल कंपनी याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी महामार्गावर धाव घेतली. संबंधित कंपनीचे अधिकारी येईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केला. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक रखडली. याची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांची समजूत काढून त्यांना महामार्गावरून बाजूला हटविण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.