ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांना वाचनाची गोडी लावण्याचे काम ग्रंथालय प्रमुखांनी करावे. यासोबतच बदलत्या काळाबरोबर ग्रंथालयांनी वाचन संस्कृती जोपासत मुलांवरही वाचन संस्कार केल्यास ग्रंथालयही खऱ्या अर्थाने ज्ञानालय होतील, असे मत राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू यांनी व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी व ग्रंथोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सवात ‘वाचन संस्कृती आणि ग्रंथालय’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. सहायक ग्रंथालय संचालक संजय बन्सोडे, अ‍ॅड. भगवान पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.जी. कोरे व साहित्यिक अशोक पवार उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना डॉ.जनबंधू म्हणाले, इंटरनेटच्या युगात प्रवेश करतांना वाचकांना सकस व प्रबोधनात्मक साहित्य वाचनाची सवय लावावी लागेल. यासाठी ग्रंथपालाने आधी पुस्तके वाचावित व नंतर त्याचा संदर्भ वाचकांना द्यावा तरच वाचन संस्कृती बळकट होईल.
संजय बन्सोड म्हणाले, ग्रंथालये पिढी घडविणारी संस्था आहे. मानवी मनावर संस्कार करण्याची क्षमता समाजाइतकीच ग्रंथालयात आहे. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांना सौजन्यपूर्ण वागणूक व चांगले साहित्य वाचण्यासाठीचा संदर्भ उपलब्ध करून दिल्यास वाचन संस्कृती व ग्रंथालय हे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होईल.
वाचन संस्कृती व ग्रंथालय याचे महत्त्व पटवून देताना अ‍ॅड. भगवान पाटील यांनी विविध दाखले दिले. सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा यासारख्या महिलांच्या संघर्षांचे साहित्य आजच्या महिलांना व पिढीला आवर्जून उपलब्ध करून द्यावे. काय वाचावे याबाबत वाचकांनी चोखंदळ असले पाहिजे. या कार्यक्रमात साहित्यिक अशोक पवार यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले. या परिसंवादानंतर ग्रंथोत्सवाचा समारोप समारंभ झाला. यावर्षीच्या ग्रंथोत्सवात विविध नामांकीत प्रकाशकांचे ३० स्टॉल्स लावण्यात आले होते.