रिक्षा संघटनांचा मात्र मीटरला पािठबा
प्रवासी आक्रमक
कल्याण-डोंबिवली शहर परिसरात मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीस नकार देणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात अखेर आरटीओने वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाईची संयुक्त मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेनंतरही अनेक रिक्षा चालक प्रवाशांना वाकुल्या दाखवत शेअर रिक्षाचा आग्रह धरत असल्याचे चित्र असून यामुळे प्रवाशी हैराण झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली परिसरात शेअर रिक्षाची चलती असली तरी एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करण्याची मागणी केली तर रिक्षा चालकास भाडे नाकारण्याचा अधिकार नाही. मीटर पद्धत सक्तीची करत आरटीओ अधिकाऱ्यांनी यासंबंघी रिक्षा चालक संघटनांच्या यापूर्वी बैठकाही घेतल्या आहेत. मात्र अनेक रिक्षा चालकांना मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक तोटय़ाची वाटत असल्याने प्रवाशांच्या मागणीनंतरही भाडे नाकारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. प्रवाशाने मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीची मागणी रिक्षा चालकाकडे केली आणि चालकाने त्यास नकार दिला तर प्रवाशाने रिक्षेत बसायचे आणि आरटीओच्या हेल्पलाइनवर दूरध्वनी करावा, असे आवाहन यापूर्वी वाहतूक पोलिसांनी केले आहे. भाडे नाकारणाऱ्या चालकाच्या रिक्षामध्ये बसूनच प्रवाशाने थेट आरटीओ अधिकारी संजय डोळे यांच्याशी ९८६७६०७७५७ व वाहतूक विभाग डोंबिवली २८६०१४६ येथे संपर्क करायचा, असे आवाहन करण्यात आले आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षेचा क्रमांक या अधिकाऱ्यांना तात्काळ द्यावा, अशा सूचनाही आरटीओने केल्या आहेत. भाडे नाकारणाऱ्या अशा रिक्षा चालकांविरोधात तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तान्तला दिली. दरम्यान, या आदेशानंतरही शहरातील रिक्षा चालक प्रवाशांना वाकुल्या दाखवत भाडे नाकारत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आरटीओने वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही मोहीम तीव्र करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र वाहतूक पोलिसांचा डोळा चुकवत भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांचे प्रमाण मोठे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मीटर पद्धतीला मोठा पाठिंबा
कल्याण-डोंबिवलीतील सर्व रिक्षांना नवे मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी मागणी केली तर चालकाने मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करणे बंधनकारक आहे. ज्या प्रवाशांना शेअर रिक्षेने प्रवास करायचा असेल त्यांना तसा तो करता येईल. मीटर आणि शेअर रिक्षांचे जे वाहनतळ आहेत त्या ठिकाणाहून या दोन्ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. याऊलट अशा पद्धतीच्या प्रवासी वाहतुकीला चालक नकार देणार असतील तर रिक्षा संघटनेकडून त्या चालकाला योग्य ती समज देण्यात येईल. आरटीओ व वाहतूक विभागाच्या या मोहिमेला रिक्षा संघटनांचा पाठिंबा आहे, अशी माहिती प्रकाश पेणकर यांनी दिली.
वाहनतळावर फलक लावा
कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक वाहनतळावर आरटीओ व वाहतूक पोलिसांनी हेल्पलाइनचे क्रमांक असलेले फलक लावावेत. अनेक प्रवाशांना हे हेल्पलाइनचे क्रमांक माहीत नसल्याने रिक्षा चालक त्याचा गैरफायदा घेतात, असे प्रवाशांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेबाबत शहरातील मुख्य रिक्षा संघटनांनी मात्र फारसे सकारात्मक धोरण स्वीकारलेले नाही. आमदार, खासदार, नगरसेवक यांनीही सोयीस्कर मौन धारण केले आहे.