* अकोल्यात राष्ट्रवादीचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न * ठिकठिकाणी रास्ता रोको, वाहनांवर दगडफेक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदनगरमध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्याचे पडसाद विदर्भात उमटले. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, कळमेश्वर, हिंगणा आणि नागपूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करून वाहनांवर दगडफेक केली. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला.
अकोल्याच्या सिव्हील लाइन्स भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या कार्यालयात पहाटेच्या सुमारास मनसेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. हे कार्यालय जाळण्याचा प्रयत्नात मनसे सैनिक होते, अशी माहिती मिळाली. या कार्यालयात जळते टायर टाकून एक खर्ची वितळलेल्या अवस्थेत सकाळी आढळली. डॉ. कोरपे यांना या विषयी पत्रकारांनी माहिती दिली. वृत्तवाहिन्यांवर बातमी प्रसारित झाल्यानंतर डॉ. कोरपे, दिलीप आसरे, गणेश पोटे यांनी कार्यालयात धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने उभी असलेली अॅम्बुलन्स फोडण्याचा प्रयत्न कोणी केला ? असा प्रश्न उपस्थित होतो. ही अॅम्बुलन्स मनसे सैनिकांनी फोडली का या विषयीला पुष्टी मिळाली नाही.या अॅम्बुलन्सचा ताबा भारिप बमसंचे आरोग्य सेलचे विदर्भ अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन मालोकार यांच्याकडे असल्याची नवी माहिती मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅम्बुलन्सचा ताबा डॉ. मालोकार यांच्याकडे कसा असा प्रश्न उपस्थित होतो. शहरात दोन ठिकाणी काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. या प्रकरणात पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबध्द केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्ला ज्यांनी कोणी केला त्यांच्याबद्दल अभिमान असल्याचे मत मनसे जिल्हाध्यक्ष विजय मालोकार यांनी व्यक्त केले.
यवतमाळ जिल्ह्य़ात वणी व मारेगाव मार्गावर मनसे कार्यकर्त्यांनी रास्तारोको केले. वणीतील हनुमान मंदिर व लालगुडी चौकात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. मारेगाव मार्गावर दोन तास रास्ता रोको करण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांनी बस अडवून प्रवाशांना खाली उतरविल्यानंतर बसचे नुकसान केले.
नागपूर शहर व जिल्ह्य़ातही पडसाद उमटले. काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. नंदनवन परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत दोन स्टार बसेसच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, कळमेश्वर हिंगणा आणि नागपूर शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निषेध करीत त्याच्या पक्षाचे पोस्टर फाडून ते जाळले. शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा निषेध करीत पुतळ्याचे दहन केले.
राज ठाकरे यांच्या जाहीर सभांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघता राष्ट्रवादी काँग्रेसची पायाखालची वाळू घसरली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शरद पवारांवर टीका केल्याने राज ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक करणे हा राष्ट्रवादीचा भ्याड हल्ला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भ संघटक हेमंत गडकरी म्हणाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ आणि पोस्टर फाडण्याचे कृत्य सुरू केले असून ते थांबविले नाही तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर देतील,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील म्हणाले.
चिखलीतील मनसेचे पदाधिकारी व सैनिक रस्त्यावर आले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रतिकात्मक कागदी पुतळा रस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत तातडीने ताब्यात घेतले. मनसेचे मदनराजे गायकवाड व अन्य सात जणांच्या विरोधात जमाव बंदी हुकूम तोडण्याच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. आज चिखली-बुलढाणा रस्त्यावर माहूरगड जळगाव या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसेसच्या काचा फुटल्या. बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निषेध केला आहे. दरम्यान, जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही यासंदर्भात आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयांची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी निषेध केला आहे. या कार्यकर्त्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सोपान साठे यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
खामगाव परिसरातील पारखेडला रास्तारोको करण्यात आला. यावेळी भारत गॅसच्या वाहनांवर मनसे कार्यकर्त्यांनी तुफानी दगडफेक केली. रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकली. या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा विशेष शाखेचे संजय पहुरकर यांनी प्रथम घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2013 रोजी प्रकाशित
राज ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याचे विदर्भात पडसाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदनगरमध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्याचे पडसाद विदर्भात उमटले. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, कळमेश्वर, हिंगणा आणि नागपूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करून वाहनांवर दगडफेक केली. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला.
First published on: 28-02-2013 at 04:15 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reflection of stone attack on raj thackreys vans in vidharbha