शहरातील अनधिकृत आणि धोकादायक बांधकामांवरील महापालिकेची कारवाई रोखण्यासाठी तथाकथित सर्वपक्षीय नेत्यांनी पुकारलेल्या ‘बंद’ची बेबंदशाही अशा शब्दात निर्भर्त्सना करून ठाण्यातील मान्यवरांनी शहरवासीयांना वेठीस धरण्याच्या लोकप्रतिनिधींच्या कृत्याचा एकमुखाने निषेध केला आहे.
एकेकाळी टुमदार शहर असणाऱ्या ठाण्यास अनधिकृत बांधकामांचे आगर बनविण्यात राजकीय नेतेच प्रामुख्याने कारणीभूत आहेत.
भूमाफिया आणि महापालिका अधिकारी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय अनधिकृत बांधकामे करूच शकत नाहीत. किंबहुना अनेक राजकीय नेत्यांची अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमध्ये छुपी भागीदारी असते. या पाश्र्वभूमीवर राजकीय नेत्यांनी ठाणेकरांवर लादलेला बंद म्हणजे चोराच्या ‘उलटय़ा बोंबा’ असल्याचा प्रकार असल्याचे मत ‘इंद्रधनू’ संस्थेचे शिशिर जोग यांनी व्यक्त केले आहे.
कवी प्रवीण दवणे यांच्या मते ठाण्यातील या बंदचे प्रयोजनच समजू शकत नाही. मुंब््रय़ात धोकादायक इमारत कोसळून ७४ निष्पाप रहिवाशांचा बळी गेला. त्यामुळेच अशा प्रकारच्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र अशा बांधकामांना अभय मिळावे म्हणून बंद पुकारून राजकीय नेते पुन्हा सामान्य जनतेलाच वेठीस धरीत आहेत, असे स्पष्ट मत दवणे यांनी नोंदविले आहे.
ज्येष्ठ पत्रकार महेश विजापूरकर यांच्या मते ठाण्यातील अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात मूळ दोषी नामानिराळेच राहिले आहेत. शहरात ७० टक्के अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासन का गप्प बसले, असा त्यांचा सवाल आहे. येथील बांधकामांवर कारवाई करण्याबरोबरच अशा इमारतींना परवानगी देणाऱ्या तसेच त्यांना वीज अथवा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, असे विजापूरकरांना वाटते. अशा प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून ‘बंद’ पुकारणे हा तर लोकशाही व्यवस्थेत सरंजामशाही लादण्यासारखा प्रकार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी पुकारलेला बंदच अनधिकृत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण किती चुकीच्या माणसांना निवडून देतो, हेच यावरून दिसून येते. केवळ मतांसाठी राजकीय नेते सर्व शहरवासीयांना वेठीस धरीत आहेत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते नीलेश आंबेकर यांनी व्यक्त केली.
केवळ मशागतांसाठी राजकीय नेत्यांनी ‘बंद’ पुकारून समस्त ठाणे शहरास वेठीस धरल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.
* सामान्य नागरिकांची तारांबळ
ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधातील हा बंद केवळ ठाण्यापुरता मर्यादित होता. मुलुंड अथवा डोंबिवली तसेच आसपासच्या इतर शहरांमधील दैनंदिन व्यवहार सुरळीत होते. त्यामुळे तिथून कामानिमित्त ठाण्यात येणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. रिक्षा आणि बस वाहतूक बंद असल्याने त्यांना शहरातील इच्छित स्थळी पोहोचता येत नव्हते. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून आलेल्या प्रवाशांचे तर खूपच हाल झाले. कारण अवजड सामानासकट स्थानक परिसरात त्यांना अडकून पडावे लागले. तसेच परगावी जाण्यासाठी मुंबईतील विविध स्थानकातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा पकडाव्या लागणाऱ्या ठाण्यातील प्रवाशांचीही तारांबळ उडाली.
* गुरूवारचा कडक उपवास..
नोकरीनिमित्त ठाण्यात येणारे अनेकजण दुपारच्या वेळी पोटपुजेसाठी बाहेर मिळणाऱ्या अन्न पदार्थावर अवलंबून असतात. बंदच्या दिवशी मात्र ठाण्यातील खवैय्यांची सर्व ठाणीही बंद होती. त्यामुळे अनेकांना गुरूवारचा कडकडीत उपवास घडला. काही फिरत्या विक्रेत्यांनी जोखीम पत्करून वर्दळीच्या रस्त्यावर इडलीचे दुकान मांडलेले दिसत होते. भुकेल्या ठाणेकरांनी त्याभोवती गर्दी करून आपली श्रुधा शांत करून घेतली..
* आणि धावले टांगे…
टीएमटी आणि रिक्षा या दोन प्रमुख वाहतुकीच्या सेवा बंद असल्याने एरवी मजेच्या रपेटीसाठी वापरल्या जाणाऱ्या टांग्यांनी गरजवंतांना तातडीची परिवहन सेवा उपलब्ध करून दिली.
* सॅटीसवर घेतला वॉक…
एरवी ठाण्यातील सॅटीसवर पादचारी व इतर खाजगी वाहनांना प्रवेश नसतो. या पुलावरून फक्त परिवहन उपक्रमातील वाहनेच ये-जा करीत असतात. बंदच्या दिवशी सॅटिसवर शुकशुकाट असल्याने पादचाऱ्यांनी त्याच्यावर वॉक घेतला.