सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या वर्षांत पडलेल्या भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी विविध सामाजिक, राजकीय, सहकारी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने तलाव, नदी, बंधारे, विहिरी व नाल्यांतील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला व पाण्याची पातळी वाढण्यास महत्वाचा हातभार लावला. हे कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे द्योतक आहे, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीवर मात करताना जिल्हा प्रशासनाला उल्लेखनीय सहकार्य केलेल्या सुमारे विविध १५० संस्था व व्यक्ती तसेच शासकीय-निमशासकीय अधिका-यांना शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिवछत्रपती रंगभवनात आयोजिलेल्या या कार्यक्रमास जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्यासह माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील, पंढरपूरचे आमदार भारत भालके आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यानी स्वागत व प्रास्ताविक केले.
गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांच्या प्रशासनाने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करीत शिंदे म्हणाले, छोटे-मोठे तलाव, नद्या, नाले, विहिरी, बंधा-यांतील मिळून ४४ कोटी घनफूट गाळ काढून त्याठिकाणची पाण्याची पातळी वाढविली व पाण्याची साठवणूक केली, हे कार्य राष्ट्रीय उत्पादन क्षमतेचे आहे. या कार्यातून प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सोलापूरचा सिध्देश्वर साखर कारखाना, मोहोळचा लोकनेते साखर कारखाना, माळशिरस तालुक्यातील शंकर, पांडुरंग, सासवड-माळी, माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, अक्कलकोटचा स्वामी समर्थ साखर कारखाना, मातोश्री शुगर, सिध्दनाथ, लोकमंगल साखर कारखाना तसेच सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समिती, सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी संस्थांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच प्रसार माध्यमांनाही गौरविण्यात आले. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांच्यासह जिल्ह्य़ातील शासकीय व निमशासकीय अधिका-यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
नद्या-नाल्यातील गाळ काढण्याचे कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे द्योतक-शिंदे
विहिरी व नाल्यांतील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला व पाण्याची पातळी वाढण्यास महत्वाचा हातभार लावला. हे कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे द्योतक आहे, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

First published on: 03-02-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Removal sludge from rivers is the work represents national service shinde