दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याची तयारी रेणुका शुगर्सच्या श्रीमती विद्या मुरकुंभी यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दाखविली. ‘दौलत’वरील न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागल्यानंतरच ‘दौलत’ भाडेतत्त्वावर हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मुंबईच्या बैठकीतून स्पष्ट झाले.
चंदगडच्या सर्व नेत्यांनी दौलत साखर कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेत साथ देण्याची ग्वाही दिली. रेणुका शुगर्सचे व्यवस्थापन, दौलतचे व्यवस्थापन आणि जिल्हा बँकेचे प्रशासक यांनी कर्जाची देणी निश्चित करावीत. गेल्या मार्च २०१२ मध्ये २४१ कोटी असलेल्या कर्जाचा आकडा २७१ कोटींवर पोहोचला असून त्यासंबंधी अंतिम देणी निश्चित करून पुढील बैठक आयोजित करण्याचे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. दौलतच्या सद्य:स्थितीची माहिती मार्गदर्शक संचालक गोपाळराव पाटील यांनी दिली. दौलत कारखाना यावर्षी कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यासाठी शरद पवारांनी आपले योगदान द्यावे, अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली. श्रीमती मुरकुंबी यांनी रेणुका शुगर्सच्या माध्यमातून दौलत भाडेतत्त्वावर चालवायला घेण्यासाठीची मान्यता या वेळी दिली. या वेळी शरद पवार यांनी दौलतवर किती कोटींचा बोजा आहे, याची माहिती घेतली. २७१ कोटींचा बोजा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पवार यांनी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचीही माहिती घेतली. नाशिकच्या थिटे कंपनीने दौलतवर केस केलेली असून त्याची तारीख येत्या ८ ऑगस्टला आहे. या केसचा निकाल झाल्यानंतर दौलतसमोरील मुख्य गुंता सुटू शकेल. तोवर इच्छा असूनही ‘दौलत’ चालवायला देता किंवा घेता येणार नाही, हे चर्चेत स्पष्ट झाले.    
बैठकीला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, सहकार आयुक्त राजगोपाल देवरा, आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, आमदार के.पी.पाटील, जे.जी.पाटील, अर्जुन कुंभार आदी उपस्थित होते.