समता सैनिक दलाच्यावतीने येत्या २४ व २५ नोव्हेंबरला बजाज नगरातील करुणा भवनात ‘रिपब्लिकन जाहीरनामा’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या निमित्ताने शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण, जमिनीचे राष्ट्रीयीकरण, जातविरहीत समाजनिर्मितीसाठी व्यापक प्रचार अभियान, महागाई विरोधात जनआंदोलन, बेरोजगारी निर्मूलन आणि संविधानाची सुरक्षा इत्यादी दहा मुद्दय़ांवर एक व्यापक कृती कार्यक्रमावर चर्चा घडवण्यात येणार आहे. येत्या २४ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता समता सैनिक दलाचे पथसंचलन होणार असून त्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक एस.आर. दारापुरी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. यावेळी गुजरात येथील ‘बामसेफ’चे अध्यक्ष बेचरभाई राठोड, अलाहाबादचे अ‍ॅड. गुरुप्रसाद मदन, केरळचे अंबुजाक्षण, तामिळनाडूचे कोथंदन आणि दिल्लीचे डॉ. राहुल दास आदी उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. डी. नीलकंथक राहतील. उद्घाटनपर सत्रात दारापुरी यांच्या हस्ते कवी केतन पिंपळापुरे यांच्या ‘मकाबी’ या चवथ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन होईल. दुपारी ३ वाजता ताराचंद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘रिपब्लिकन जनचेतना : आमची राजकीय अभिव्यक्ती’ या विषयावरील परिसंवादात बुद्धशरण हंस, प्राध्यापक एम.ए. पवार, डॉ. यशवंत तिरपुडे, अ‍ॅड. शिवराज कोळीकर, अंबुजाक्षण आणि दीपक दाभाडे विचार व्यक्त करतील.
दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता अ‍ॅड. वासुदेवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘भूमिहीन आंदोलन- मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवाद्यांच्या कक्षेत’ या परिसंवादात डॉ. वामन गवई, डॉ. विमलकीर्ती, अ‍ॅड. विष्णू ढोबळे, अरविंद शेंडे, डब्ल्यू दीपक, पी.के. संतोषकुमार आदी विचार मांडणार आहेत. दुपारी ३ वाजता ‘भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीत रिपब्लिकन जनचेतनेची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात अशोक भारती, अशोक डोंगरे, अ‍ॅड. दलित राजगोपाल, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, जनार्दन लोखंडे, पुरुषोत्तम संबोधी, डॉ. शीला दांडगे, रामचंद्र धम्मा आदी भाष्य करतील. मार्शल प्रकाश दार्शनिक परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राहतील. सायंकाळी ७ वाजता समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय सत्र होईल.